कन्हैया काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींना भेटल्यानं चर्चेला उधाण

कन्हैया व राहुल गांधी यांची दोनदा भेट झाली आहे. दोन्ही बैठकांना राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हेही उपस्थित होते.
Kanhaiya Kumar meets Rahul Gandhi likely to join Congress
Kanhaiya Kumar meets Rahul Gandhi likely to join Congress

नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (CPI) नेता व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्याची वृत्त आहे. काँग्रेस प्रवेशावरून दोघांमध्ये प्राथमिक चर्चा झाली असल्याचे सुत्रांनी सांगितले. (Kanhaiya Kumar meets Rahul Gandhi likely to join Congress)

काँग्रेसमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया व राहुल गांधी यांची दोनदा भेट झाली आहे. दोन्ही बैठकांना राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हेही उपस्थित होते. काँग्रेसमध्ये येण्याबाबत वाटाघाटी सुरू असून त्या अंतिम टप्पायात आहेत, असे बिहारमधील काँग्रेसच्या एका नेत्यानं सांगितलं. कन्हैया कुमार हा मुळचा बिहारचा असल्यानं या राज्यात त्याच्यामागे कार्यकर्त्यांची फौज आहे. 

कन्हैया कुमार याने 2019 मध्ये भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांच्याविरोधात बिहारमधील बेगुसराई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत कन्हैयाचा पराभव झाला होता. मागील तीन दशकांपासून बिहारमधील काँग्रेसच्या विधानसभेच्या जागा सातत्याने कमी होत आहेत.  मागील निवडणुकीत काँग्रेसला निवडणूक लढवलेल्या 70 पैकी केवळ 19 जागा मिळाल्या. 

बिहारमधील काँग्रेसचे नेते जतीन प्रसाद यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच ज्योतिरादित्य शिंदे, प्रियांका चतुर्वेदी, सुष्मिता देव यांनीही काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यामुळं काँग्रेसला प्रत्येक राज्यामध्ये तरूण चेहरा हवा आहे. त्यासाठी बिहारमध्ये कन्हैयाकडे पाहिले जात आहे. त्यामुळं त्याला पक्षात येण्यासाठी गळ घातली जात असल्याची चर्चा आहे. 

काँग्रेसमधील एका गटाचा मात्र कन्हैयाच्या प्रवेशाला विरोध आहे. विद्यापीठाच्या राजकारणापासून सक्रीय राजकारणात आल्यानंतर कन्हैया कुमारच्या अनेक वक्तव्यांनी वाद निर्माण झाला आहे. त्यामुळं डावे पक्षही अडचणीत आले आहेत. तसेच त्याच्यावरही गुन्हे दाखल आहेत. पण त्याच्या वक्तृत्वाचा पक्षाला फायदाही होऊ शकतं, असं काही नेत्यांचं म्हणणं असल्याचं सुत्रांनी सांगितलं. उत्तर प्रदेश निवडणुकीतही त्याला प्रचारासाठी उतरवलं जाऊ शकतं, अशीही चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com