भाजप आमदारांच्या गोंधळामुळं राज्यपालांनी पाच मिनिटांत केलं 'वॅाकआऊट' - Governor leaves assembly without ending speech amid BJP protest | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

भाजप आमदारांच्या गोंधळामुळं राज्यपालांनी पाच मिनिटांत केलं 'वॅाकआऊट'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जुलै 2021

आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं.

कोलकता : राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील संघर्ष वाढलेला असताना आज भाजप आमदारांनीच घातलेल्या गोंधळामुळं राज्यपालांना आपलं अभिभाषण अर्धवट थांबवावं लागलं. भाषण पूर्ण न करताच राज्यपाल पाच मिनिटांत निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पश्चिम बंगालच्या (West Bengal) विधानसभेत आज हे दृश्य पाहायला मिळालं. (Governor leaves assembly without ending speech amid BJP protest) 

बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं. पण या अधिवेशनाला अनेक वादांची किनार आहे. राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यातील संघर्ष तीव्र झालेला आहे. निवडणुकीनंतर बंगालमध्ये झालेल्या हिंचारावरून हा संघर्ष पेटला आहे. राज्यपालांकडून सातत्याने राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं जात आहे. तर तृणमूल काँग्रेसचे नेतेही सातत्यानं राज्यपालांना लक्ष्य करत आहेत. 

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांचा कट

भाजपनेही हिंसाचारावरून सुरूवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच प्रत्यय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आला. अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच भाजपच्या आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे राज्यपालांना भाषणादरम्यान सातत्याने अडथळे आले. त्यांना आपलं भाषण पूर्णही करता आलं नाही. भाषण अर्धवट सोडून त्यांना जावं लागलं. केवळ पाचच मिनिटांत त्यांनी गोंधळामुळं भाषण थांबवून विधानभवन सोडलं. तसेच भाजपच्या आमदारांनीही वॅाकआऊट केलं. राज्य सरकारला घेरण्यासाठी भाजपने जाणीवपूर्वक हा गोंधळ केल्याचा आरोप तृणमूलच्या नेत्यांकडून केला जात आहे. 

राज्यपाल जगदीप धनखर हे काही दिवसांपूर्वीच दिल्लीत जाऊन आले आहेत. त्यांनी तिथं दोनवेळा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही ते भेटले. या भेटीनंतर ते थेट उत्तर बंगालच्या दौऱ्यावर आठ दिवसांसाठी गेले. तिथून ते नुकतेच परतले असून लगेचच राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यात लोकशाही नसल्याचा आरोपही त्यांच्याकडून सातत्याने केला होता.

हेही वाचा : राज्यपाल कोश्यारींच्या गुगलीवर मुख्यंत्र्यांचा सिक्सर

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखर यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. राज्यपालांचं नाव 1996 मधील जैन हवाला प्रकरणात होतं, असा दावा त्यांनी केला. तेच त्यांना हटवण्यासाठी आपण तीन वेळा पत्रव्यवहार केल्याचंही ममतांनी सांगितलं. आमच्या सरकारला मोठं बहुमत मिळूनही ते एकाधिकारशाही का गाजवत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

या गंभीर आरोपांनंतर राज्यपालांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री पदाला अशी सनसनाटी निर्माण करणं शोभत नसल्याची टीका धनखर यांनी केली आहे. ते म्हणाले, त्यांच्या पदाच्या नेत्याकडून अशी सनसनाटी निर्माण करणे आणि चुकीची माहिती देणे अपेक्षित नव्हते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ही वक्तव्य दुर्दैवी आहेत. तुमच्या राज्यपालांचे नाव कधीच आरोपपत्रात नव्हतं. आरोपी असल्याबाबतचं कोणतंही कागदपत्रं उपलब्ध नाही. ही चुकीची माहिती आहे. मी कधीही हवाला प्रकरणात न्यायालयाची स्थगिती घेतलेली नाही, कारण असं काही घडलंच नाही.

दरम्यान, ममता सरकारकडून विधानसभेत राज्यपालांना हटवण्याबाबत ठराव मंजूर करण्याची शक्यता आहे. येत्या दोन जुलै रोजी विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशन हा ठराव मांडला जाईल, असे सुत्रांकडून सांगितलं जात आहे. या मुद्यांवर सरकारमध्ये खलबतं सुरू असून ममतानी विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांच्याशीही चर्चा केल्याचं समजतं. बिमन बॅनर्जी यांनीही लोकसभा अधयक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राज्यपालांची तक्रार केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख