CM uddhav thackeray replies to governor bhagat singh koshyari letter
CM uddhav thackeray replies to governor bhagat singh koshyari letter

राज्यपाल कोश्यारींच्या 'गुगली'वर मुख्यमंत्री ठाकरेंचा 'सिक्सर'

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली होती. याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठविलेल्या पत्रामुळे आता खळबळ उडाली होती. आता उद्धव ठाकरेंनी याला सविस्तर उत्तर दिले आहे. उद्धव यांनी उलट राज्यपालांनाच आता गुगली टाकून त्यांना अडचणीत आणले आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने 23 जूनला राज्यपालांची भेट घेतली होती. यात त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. यावर राज्यपालांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 24 जूनला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी विधिमंडळाचे अधिवेशन जादा कालावधीसाठी घेणे, विधानसभा अध्यक्षांचे संविधानिक पद तातडीने भरण्याबाबत कार्यवाही करणे आणि राज्यातील ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक सद्यस्थितीत ने घेणे या प्रमुख तीन मुद्द्यांचा समावेश होता.  

उद्धव ठाकरेंना आता या पत्राला उत्तर पाठवले आहे. राज्यपालांच्या पत्रातील तिन्ही मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी सयुक्तिक उत्तर दिले आहे. याचबरोबर तिन्ही मुद्द्यावर सरकार कशा पद्धतीने कार्यवाही करीत आहे याचे सविस्तर विवेचन दिले आहे. ओबीसी आरक्षणप्रश्नी केंद्र सरकारने मदत करावी, यासाठी राज्यपालांनी प्रयत्न करावेत, अशी गुगलीही त्यांनी टाकली आहे. यामुळे राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तोंडघशी पडल्याचे चित्र आहे.  राज्यपालांना आता मुख्यमंत्र्यांचा पत्रावर कार्यवाही करणे अडचणीचे ठरणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 


उद्धव ठाकरेंचे राज्यपालांना पत्र 

आदरणीय राज्यपालजी,

जय महाराष्ट्र !

आपले दि. २४ जून, २०२१ रोजीचे पत्र प्राप्त झाले. सदर पत्रामध्ये नमूद केल्यानुसार श्री. देवेंद्र फडणवीस, मा. विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र विधानसभा यांच्या शिष्टमंडळाने आपणांस सादर केलेल्या निवेदनातील मुद्दयांबाबत खालीलप्रमाणे वस्तुस्थिती आहे.

१. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक दि. २२ जून, २०२१ रोजी मुंबई येथे संपन्न झाली. कोविड १९ मधील डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञांनी व्यक्त केलेली चिंता आणि केंद्र सरकारने दिलेला सावधगिरीचा इशारा यावर या बैठकीमध्ये सखोल विचारविनिमय करण्यात आला. त्यानुसार, केवळ ज्या कामकाज सल्लागार समितीला अधिवेशनाचा कालावधी ठरविण्याचा अधिकार आहे, त्याच समितीने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून, सन २०२१ च्या द्वितीय (पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दि. ५ जुलै ते ६ जुलै, २०२१ असा दोन दिवसांकरीता निश्चित केलेला आहे. याबाबत मी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, राज्यामध्ये सध्या असलेली कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. त्यातच तिस-या लाटेचीही तीव्र शक्यता या क्षेत्रातील तज्ञांनी, केवळ आपल्या राज्यापुरतीच नव्हे तर संपूर्ण देशाबाबत व्यक्त केलेली आहे. संभाव्य अशा तिस-या लाटेच्या दाहकतेबाबत देखील या तज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे.

२. भारतीय संविधानाच्या कलम १७८ तसेच महाराष्ट्र विधानसभा नियम, ६ अन्वये विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येते. तथापि, याकरिता विवक्षित कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जास्त काळ अधिवेशन घेता येणे शक्य झाले नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील बहुतांश राज्यातही अल्प कालावधीची अधिवेशने घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे राज्यात अध्यक्षांची निवडणूक घेता आलेली नाही. सद्य:स्थितीत श्री. नरहरी झिरवळ, मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांना अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या अध्यक्षपदाखाली नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाही पार पडले आहे. त्यामुळे सदर निवडणुकीअभावी कोणत्याही सांविधानिक तरतूदीचा भंग झालेला नाही अथवा घटनात्मक अडचण निर्माण झालेली नाही.

विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीमध्ये शक्यतो प्रत्येक विधानसभा सदस्याला प्रत्यक्ष भाग घेता येईल, अशा पध्दतीने ही निवडणूक घेणे योग्य होईल याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. ही निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशी सरकारचीही इच्छा आणि तसा प्रयत्नही आहे..

राज्यातील जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्या आरोग्याबाबत पुरेशी काळजी घेणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. याबाबतीत हयगय करून चालणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वैद्यकीय मार्गदर्शक तत्वानुसार ७२ तासांच्या आतील कोविडची आरटीपीसीआर चाचणी ग्राह्य धरण्यात येते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबतची तारीख अगोदर निश्चित करणे योग्य ठरणार नाही. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सदस्यांचे आरोग्य व त्यांची उपस्थिती याबाबत संपूर्ण खात्री झाल्यानंतर महाराष्ट्र विधि मंडळाच्या सर्व नियमांची पूर्तता करुन विधानसभा अध्यक्षांची योग्य वेळेत निवड करण्यात येईल.

३. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिका (सिव्हील) क्र. ९८०/२०१९ व इतर यामधील दि. ४ मार्च २०२१ च्या आदेशानुसार ६ जिल्हा परिषदा व २७ पंचायत समित्यांमधील नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गातील निवडून आलेल्या उमेदवारांची फेर निवडणूक करण्याबाबत आदेशित केले आहे, त्याला अनुसरुन राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकाराअन्वये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

तथापि, टास्क फोर्ससह देशातील विविध तज्ज्ञ व वैद्यकीय संस्था यांनी सूचित केल्यानुसार राज्यात कोरोना विषाणूच्या संक्रमणाची शक्यता व याबाबत केंद्र शासनामार्फत सावधगिरी बाळगण्याची मार्गदर्शिका/सूचना लक्षात घेता, या निवडणुका घेतल्यास विषाणू संसर्ग वाढून प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील या पोट निवडणूकांचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाला राज्य शासनाने केली असून त्यांच्याकडून सकारात्मक उत्तराची अपेक्षा आहे. तसेच याबाबतची विनंती करणारा अर्ज सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयातही दाखल करण्यात आलेला आहे.

राज्य शासनास इतर मागास प्रवर्गाची काळजी आहे, आणि म्हणूनच काही दिवसांपूर्वी मा. पंतप्रधान महोदय यांच्याशी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आम्ही इतर मागास प्रवर्ग आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे उद्भविलेल्या परिस्थितीतून कायमस्वरुपी घटनात्मक मार्ग काढावा म्हणून विनंती केली आहे. या प्रवर्गाच्या राजकीय प्रतिनिधीत्वासाठी मागासपणा निश्चित करण्याकरीता इम्पिरीकल डेटा आवश्यक आहे. हा डेटा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून त्याची माहिती राज्य सरकारला मिळाल्यास आरक्षणासाठी अभ्यास करुन जरुर ती पुढील कार्यवाही करता येईल असेही आम्ही पंतप्रधान महोदयांना विनंती करुन सांगितले आहे. आपणही मा. पंतप्रधानांकडे याबाबतीत योग्य तो पाठपुरावा लवकरात लवकर करुन या समाजास न्याय मिळवून द्याल अशी मला खात्री वाटते व तशी याद्वारे मी आपणांस विनंतीही करीत आहे.

तथापि, या संवेदनशील प्रश्नाचे महत्त्व पाहता मी आपणांसही विनंती करु इच्छितो की, आपणही आपल्या स्तरावर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन इतर मागास प्रवर्गाच्या २०११ मधील जनगणनेमधील इम्पिरीकल डेटा मिळवून द्यावा, जेणेकरुन पुढील आवश्यक पाऊले उचलणे राज्य शासनास शक्य होईल.

आपणाकडून या संदर्भात सहकार्य केले जाईल अशी मला खात्री असून आपल्या सहकार्याबद्दल मी

आपला आभारी राहीन.

जय महाराष्ट्र !!!

आपला नम्र,

उद्धव बाळासाहेब ठाकरे
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com