शशिकलांच्या नातेवाईकाला पोलिसांकडून अटक

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती शशिकला यांची कारागृहातून 27 जानेवारीला सुटका होणे अपेक्षित आहे. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकाला अटक झाली आहे.
aiadmk leaders sasikala relative held in smuggling case by police
aiadmk leaders sasikala relative held in smuggling case by police

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती व अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या व्ही.के.शशिकला यांची कारागृहातून 27 जानेवारीला सुटका होणे अपेक्षित आहे. आता शशिकला यांच्या नातेवाईकाला त्याच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली, असून, त्याच्यावर रक्तचंदनाची तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शशिकलांच्या सुटका होण्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. 

शशिकला यांच्या नातेवाईकाचे नाव भास्कर असे आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शशिकला यांच्यासमवेत शिक्षा भोगत असलेल्या इलावरसी यांचा तो व्याही आहे. शशिकला यांचा भाऊ जयरामन यांच्या पत्नी इलावरसी आहेत. भास्कर पुढील तपासासाठी आंध्र प्रदेशला नेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भास्कर ऊर्फ कट्टाई भास्कर याच्या विरोधात आंध्र प्रदेशात तस्करीचे 28 गुन्हे दाखल आहेत. भास्करने चेन्नईत एक फर्निचरचे दुकान सुरू केले होते. त्याच्या मुलीचा विवाह जयरामन यांचा मुलगा विवेक याच्याशी झाला होता. त्यानंतर त्याने दुकान व इतर व्यवसाय राजा या भावाकडे सोपवला होता. 

राजा याला नंतर रक्तचंदन तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो आजारी पडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा 2018 मध्ये मृत्यू झाला होता. राजा याच्या मृत्यूनंतर भास्कर याने पुन्हा व्यवसायात प्रवेश केला आहे. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात आहेत. कारागृहातील चांगले वर्तन गृहित धरुन शिक्षेचा कालावधी संपण्याआधी सुटका करावी, अशी मागणी करणारा अर्ज त्यांनी कारागृह प्रशासनाकडे केला होता. कारागृह प्रशासनाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली होती. यामुळे शशिकला यांची लवकर सुटका होण्याची शक्यता मावळली होती. शशिकला यांची शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 27 जानेवारीला अथवा त्याआधी सुटका होईल. 

भाजप पुन्हा तमिळनाडूच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे. द्रमुकला नामोहरम करण्यासाठी भाजपकडून अण्णाद्रमुकला मदत केली जात आहे. शशिकला या तुरुंगातून सुटल्यास तमिळनाडूतील राजकारणात फार मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या राज्यातील राजकारणात सक्रिय होण्याने अनेक राजकीय समीकरणे बदलू शकतात. राज्यात यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com