शशिकलांच्या सुटकेआधीच अण्णाद्रमुकमध्ये भयकंप...एकी दाखवण्यासाठी दोन्ही गटांची धडपड

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती शशिकला यांची या महिन्यात कारागृहातून सुटका होत आहे. यामुळे अण्णाद्रमुकच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
aiadmk leaders show unity ahead of sasikala release from jail
aiadmk leaders show unity ahead of sasikala release from jail

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती व अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या व्ही.के.शशिकला यांची कारागृहातून 27 जानेवारीला सुटका होणे अपेक्षित आहे. शशिकलांची सुटका होण्याआधीच अण्णाद्रमुकमध्ये भयकंप झाला आहे. मुख्यमंत्री एडापाडी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी आता पक्षात एकी दाखवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. आज झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीतही याचे प्रतिबिंब दिसून आले. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात आहेत. कारागृहातील चांगले वर्तन गृहित धरुन शिक्षेचा कालावधी संपण्याआधी सुटका करावी, अशी मागणी करणारा अर्ज त्यांनी कारागृह प्रशासनाकडे केला होता. कारागृह प्रशासनाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली होती. यामुळे शशिकला यांची लवकर सुटका होण्याची शक्यता मावळली होती. शशिकला यांची शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 27 जानेवारीला अथवा त्याआधी सुटका होईल. 

शशिकलांच्या सुटकेआधीच अण्णाद्रमुकचे नेते धास्तावले आहेत. आज अण्णाद्रमुक पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री पलानीस्वामी हेच आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असा ठराव मांडण्यात आला. याचबरोबर निवडणूक आघाडी आणि जागावाटप यांचे सर्वाधिकार मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्याकडे देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. 

अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाने पक्षातील सर्व गटांना खूष करण्याचे सत्र सुरू केले आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये मतदारसंघ पुनर्रचना करण्यात आली आहे. तळागाळात पक्षाचा विस्तार व्हावा यासाठी 73 जिल्हा चिटणीस आणि 31 विभागीय प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे कामकाज करताना समतोल साधला जावा, यासाठी समन्वय समिती असावी, अशी मागणी पनीरसेल्वम यांनी केली होती. त्यानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. यात दोन्ही गटांच्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. 

भाजप पुन्हा तमिळनाडूच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे. द्रमुकला नामोहरम करण्यासाठी भाजपकडून अण्णाद्रमुकला मदत केली जात आहे. शशिकला या तुरुंगातून सुटल्यास तमिळनाडूतील राजकारणात फार मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या राज्यातील राजकारणात सक्रिय होण्याने अनेक राजकीय समीकरणे बदलू शकतात. राज्यात यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. 

जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांची अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी पक्षातील सहकारी ओ. पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. त्यानंतर शशिकला यांनी तुरुंगात जाण्याआधी के.पलानीस्वामी यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली होती. अखेर पलानीस्वामी मुख्यमंत्री बनले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर पलानीस्वामी यांनी शशिकला यांचे पुतणे टी.टी.व्ही. दिनकरन पक्षातून हाकलून पनीरसेल्वम यांना पुन्हा पक्षात घेतले होते. यानंतर दिनकरन यांनी अम्मा मक्कल मुनेत्र कळघम पक्षाची स्थापना केली होती. यामुळे शशिकलांच्या सुटकेनंतर राज्यात मोठी उलथापालथ होणार आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com