तालिबानच्या धसक्यानं दिल्लीतही हुंदके! 

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सर्वजणतालिबानी राजवटीच्या यापूर्वीच्या कटू आठवणींनी हादरले आहेत.
Afghani citizens in delhi have worried about relatives
Afghani citizens in delhi have worried about relatives

नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्यदिनी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सर्वजण तालिबानी राजवटीच्या यापूर्वीच्या कटू आठवणींनी हादरले आहेत. तालिबानच्या धसक्यानं दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये राहणाऱ्या अफगाणी नागरिकही हतबल झाले आहे. अनेकांची कुटूंबे अफगाणिस्तानमध्ये असल्यानं त्यांच्या काळजीपोटी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे.  

तालिबानच्या भीतीने अफगाणिस्तानमधील अनेक जण रविवारी भारतात आले आहेत. त्यांनी भारतात आल्यानंतर तेथील भयावह परिस्थितीची आपबीती सांगितली होती. तसेच अनेक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियांसह वृत्तवाहिन्यांवर येत आहेत. त्यामुळं भारतात राहणाऱे अफगाणी नागरिकही खचून गेले आहेत. प्रामुख्याने राजधानी दिल्लीतील एनसीआर भागात स्थायिक झालेल्या हजारो अफगाणी तरूणांना, नागरिकांना आपल्या काबूल, कंदाहार व अफगाणिस्तानातील विविध शहरांत राहणाऱ्या नातेवाईकांची चिंता वाटत आहे. 

दिल्लीतील लाजपत नगर, भोगल त्याचप्रमाणे नोएडा, ग्रेटर नोएडा , गुडगाव आदी दिल्ली शेजारच्या भागांत सुमारे 15 हजारांहून अधिक अफगाणी नागरिकांचे वास्तव्य आहे. अफगाणिस्तानात पहिल्यांदा तालिबानी हल्ला झाला तेव्हा 90 च्या दशकात यातील अनेक जण दिल्लीत आले अन् स्थिरावले आहेत. लाजपतनगर भागातील एक भाग तर अफगाणी मार्केट म्हणून ओळखला जातो. या नागरिकांना आता दिल्ली आपलीशी वाटू लागली आहे. त्यांचा परस्परांशी संवाद अफगाणी भाषेत असली तरी अनेकजण हिंदीही बोलतात. 

दोन मुलांसह वहिनीला तालिबान्यांनी अडवलं होतं

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर येथील अनेकांनी आपल्या व्यथा मांडल्या. खालीद नूर या तरूणाने सांगितले की, तालिबानी काबूलमध्ये घुसले तेव्हा माझी वहिनी एकटीच घरी होती. त्यांची दोन्ही मुलं शाळेत गेलेली. तालिबानी आल्याचे कळाल्यानंतर मुलांना आणण्यासाठी वहिनीने जिवाचं रान केलं. एका ठिकाणी तिला तालिबान्यांनी अडविलंही...पण अल्लाहची कृपा म्हणून ती त्यांच्या तावडीतून निसटली. आम्ही दिल्लीत सुखरूप असलो तरी माझे वडील, भाऊ-वहिनी व त्यांच्या मुलांची काळजी लागून राहिली आहे, असं खालीद म्हणाला. 

एका अफगाणी नागरिकाच्याच टाईल्सच्या दुकानात काम करणारा हुमायूं रझा यालाही आपल्या नातेवाईकांच्या काळजीनं पोखरलं आहे. तो नववी- दहावीत असतानाच आई व बहिणीला घेऊन दिल्लीत आला आहे. या दोघांचेही नातेवाईक अफगाणिस्तानात असून ते भारतात येतील की नाही, याचीच चिंता लागून राहिली आहे. तसेच दिल्लीसह भारताच्या विविध भागात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील अनेकांनी तालिबानच्या भीतीने व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला आहे.

व्हिसा मिळण्यात अडचणी येत असल्यानं मुश्ताक हुसेन, नबी उल्लाह व वासेह सल्ता या विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर निराशेचे मळभ दिसत होते. आमच्या अफगाणमधील नातेवाईकांकडील पैसे संपले आहेत. आमचा अफगाणिस्तान आता बरबाद झाला, असं शाहरूख नूर यांनी भरल्या डोळ्यांनी सांगितले. अफगाणिस्तानात अमेरिकी सैन्य असताना स्थानिक तरूणांना लष्करी प्रशिक्षण दिले गेले होते. त्यातील सुभान जियामल हा तरूण तीन महिन्यांपूर्वीच भारतात आला आहे. त्याचेही सर्व नातेवाईक अडकून पडले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com