cm fadsnvis gives answer about water conservation | Sarkarnama

महाराष्ट्रात पाणी का अडलं नाही? : देवेंद्र फडणवीस यांनी शोधलं उत्तर!

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 12 ऑगस्ट 2018

अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या वाॅटर कप स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पुण्यात दिमाखात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या निमित्ताने जोरदार टोलेबाजी केली.  

पुणे : "पाणी आडवा, पाणी जिरवा` हा विकासाचा मार्ग होता. पण तो विचार मागे पडून एकमेकाला अडवा आणि एकमेकांची जिरवा असं राजकारण गावोगावी सुरू झाल्यामुळे  जलसंधारण झाले नाही," असे स्पष्टीकरण  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात दिले..

पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज पुण्यात झाला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी "गेल्या साठ वर्षात सिंचनाचा पैसा गेला कोठे, असा सवाल केला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी  राजकीय अडवाअडवीमुळे जलसंधारण झाले नाही,' असे सांगितलं.

 याच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  राज ठाकरे यांना जोरदारपणे  उत्तर देताना 'काही लोक बोलघेवडे असतात. त्यांना काहीच काम  करायचं नसतं. फक्त सभा गाजवायच्या असतात,`` असा टोमणा मारला.  यानिमित्ताने या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी रंगल्याचे चित्र होते.

 फडणवीस यांनी अमीर खान यांचे कौतुक करत  "ते  दरवर्षी दोन चित्रपट करायचे. पण त्यांनी चित्रपटाकडचे लक्ष कमी करून आपली सगळी ताकद गाव पाणीदार करण्यासाठी लावली आहे. त्यांनी सामान्य माणसांचा आत्मसन्मान जागवला. आपल्या गावाचा विकास आपणच करू शकतो, असा विश्वास त्यांनी लोकांना दिला. मीच माझ्या गावाचा विकास करू शकतो, हा विचार पाणी फाऊंडेशनने दिला आहे. "

अजित पवार यांनी पाण्याची पातळी वाढली म्हणून अतिउपसा नको असे सांगितले त्यावर  फडणवीस यांनी पवार यांच्या मताला दुजोरा देत नवी पीकपद्धतच दुष्काळापासून वाचवू शकते.' असे सांगितले.  या कार्यक्रमात अजित पवार आणि राज ठाकरे यांची जुगलबंदी मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली.

वाचा आधीच्या बातम्या :- राज ठाकरे हे बोलघेवडे : अजित पवार यांचा टोला

आमीरच्या वाॅटर कप स्पर्धेत राज ठाकरे यांचे फडणवीस, अजित पवार यांना पाणीदार प्रश्न

राज ठाकरे यांना फावडे कसे वापरावे माहीत नाही...

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख