मिले सूर मेरा तुम्हारा...चार वर्षांनंतर मुख्यमंत्री पोचले उपमुख्यमंत्र्यांच्या घरी

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असून, भाजपमधील मतभेद वाढू लागले आहेत.
yogi adityanath attends ceremony at keshav prasad maurya house
yogi adityanath attends ceremony at keshav prasad maurya house

नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) पुढील वर्षी विधानसभा निवडणूक (Assembly Election) होत असून, भाजपमधील मतभेद वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याबद्दल पक्षात नाराजी वाढत असताना त्यांनी तब्बल चार वर्षांनतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या (Keshav Prasad Maurya) घरी हजेरी लावली आहे. योगींनी मौर्य यांच्या घरी मेजवानीला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षातील मतभेद दूर करण्यासाठी योगींना पावले उचलल्याचे हे निदर्शक मानले जात आहे. 

केशव प्रसाद मौर्य यांच्या मुलाचा नुकताच विवाह झाला. या विवाहानंतर मौर्य यांनी त्यांच्या घरी विशेष मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. राज्यात 2017 मध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर चार वर्षांत पहिल्यांदाच योगींनी मौर्य यांच्या घरी हजेरी लावली. यामुळे पक्षात सर्व काही आलबेल आहे, असा संदेश योगींनी दिल्याचे मानले जात आहे. 

या मेजवानीबद्दल अतिशय गोपनीयता बाळगण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मेजवानी योगी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांचे वधू-वरांना आशीर्वाद मिळावेत, यासाठी आयोजित करण्यात आली होती. मौर्य यांचे पुत्र योगेश यांचा विवाह 22 मे रोजी रायबरेलीमध्ये अंजली यांच्यासोबत झाला होता. मौर्य यांनी स्वत: ट्विट करुन या मेजवानीची माहिती दिली. या भेटीतून पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका होत आहे. याचबरोबर सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद आहेत. अनेक नेते उघडपणे योगींच्या विरोधात बोलू लागले आहेत. पक्षात दिवसेंदिवस वाद वाढत आहेत. यातच कोरोना संकट हाताळण्यातील चुकांमुळे जनतेत नाराजी आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने ही बाब गंभीरपणे घेतली आहे. देशातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक 2024 मधील केंद्र सरकार कुणाचे असेल, हे दर्शविणारी असेल. 

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत असून, राज्यातील जनतेत सरकारबद्दल असलेल्या नाराजीची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या जागी मुख्यमंत्रिपदी नवीन चेहरा येईल, अशी चर्चा होती. परंतु, योगींना बदलण्यास पक्षाने नकार दिला आहे. याचबरोबर प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनाही बदलण्यात येणार नाही. या ऐवजी मंत्रिमंडळात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळात काही नवीन चेहरे येतील. उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणे समोर ठेवून त्यांची निवड होईल, असे सूत्रांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com