मंत्रिपद का नाही? येडियुरप्पांच्या पुत्राने मौन सोडलं अन् केला खुलासा

कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी यावरुन गदारोळ सुरुच आहे.मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांचे पुत्र बी.वाय.विजयेंद्र यांचा समावेश नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
yediyurappa son b y vijayendra clarifies about ministerial berth in karnataka
yediyurappa son b y vijayendra clarifies about ministerial berth in karnataka

नवी दिल्ली : कर्नाटकात (Karnataka) मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी यावरुन गदारोळ सुरुच आहे. मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांचे (B. S.Yediyurappa) पुत्र बी.वाय.विजयेंद्र (B.Y.Vijayendra) यांचा समावेश नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विजयेंद्र यांना डावलून भाजप नेतृत्वाने एकप्रकारे येडियुरप्पांना शह दिल्याची चर्चा सुरू होती. अखेर विजयेंद्र यांनी या प्रकरणी मौन सोडले आहे. 

कर्नाटकात नुकताच मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यावेळी 29 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले. नव्या मंत्रिमंडळात 7 ओबीसी, 3 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 8 लिंगायत, 1 रेड्डी आणि 1 महिला आहे. मंत्रिमंडळात 6 नवीन चेहरे आहेत. यात येडियुरप्पांच्या पुत्राला डावलण्यात आले आहे. येडियुरप्पांनी पुत्राच्या मंत्रिपदासाठी आग्रह धरला होता. परंतु, पक्ष नेतृत्वाने याला महत्व दिले नव्हते. 

येडियुरप्पांचे पुत्र बी.वाय. विजयेंद्र यांनी अखेर मौन सोडून यावर खुलासा केला आहे. ते म्हणाले की, माझ्या वडिलांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना कोणतीही अट पक्षावर टाकली नव्हती. मला मंत्रिपद मिळावे, अशी मागणी त्यांनी केली नव्हती. मलाही नव्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याची अपेक्षा नव्हती. मी आमदारही नसल्याने हे शक्य नाही. माझ्या वडिलांच्या कारकिर्दीवर कलंक लावण्यासाठीच माझ्या मंत्रिपदाची चर्चा पसरवण्यात आली. येडियुरप्पांनी 40 ते 45 वर्षे संघर्ष करीत पक्षाची उभारणी केली. या पातळीपर्यंत हा पक्ष पोचला. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. 

माझ्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे मला मंत्रिमंडळात समाविष्ट न केल्यामुळे दु:ख झालेले नाही. मी येडियुरप्पांचा मुलगा आहे म्हणून, मी मंत्री बनण्यास इच्छुक आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. येडियुरप्पांनी विजयेंद्र यांच्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर दबाव आणला होता, अशी चर्चा सुरू होती. विजयेंद्र यांच्यासह येडियुरप्पांच्या अनेक समर्थकांना मंत्रिमंडळात डावलण्यात आलेले नाही.  

विजयेंद्र यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नसल्याचे खुद्द बोम्मई यांनीच जाहीर केले होते. येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना विजयेंद्र हे सुपरसीएम असल्याची टीका मंत्रिमंडळातील सहकारी करीत होते. मुलामुळेच येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागला, अशीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विजयेंद्र यांनी वगळून पक्ष नेतृत्वाने येडियुरप्पांना मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी येडियुरप्पांशी चर्चा केली होती. याचबरोबर पक्षाचे प्रभारी अरुणसिंह यांनी खुद्द विजयेंद्र यांच्याशी चर्चा केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com