वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय नेमके आहेत तरी कोण? - who is champat rai general secretary of ram mandir trust | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय नेमके आहेत तरी कोण?

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जून 2021

राम मंदिरासाठीच्या जमीन खरेदीतील गैरव्यवहारावरून राजकारण तापलं आहे. या वादाच्या केंद्रस्थानी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हे आहेत. 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या (Ram Mandir) जमीन खरेदीतील गैरव्यवहारावरून (Land Scam) देशभरातील राजकारण तापलं आहे. जमीन खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा खुलासा राम मंदिर ट्रस्टने (Ram Mandir Trust) केला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय (Champat Rai) हे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता ट्रस्टची धुरा सांभाळण्यापर्यंत पोचला आहे. 

राम मंदिराच्या निर्माणासाठी मोदी सरकारने ट्रस्टची स्थापना केली त्यावेळी अध्यक्षपदी मंहत नृत्यगोपालदास यांची तर सरचिटणीसपदी चंपत राय यांची निवड केली. यानंतर बिजनौरमधील नगीना परिसरात जल्लोष करण्यात आला. कारण चंपत राय हे त्या परिसरातील आहेत. विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष असलेले चंपत राय हे राम मंदिर खटल्याच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत मुख्य पक्षकार होते. या खटल्यात महत्वाचे साक्षीदार गोळा करुन त्यांना सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. 

चंपत राय यांचा लहानपणापासूनच संघाचा संबंध आला. ते युवावस्थेत संघाचे प्रचारक होते. ते धामपूर येथील आश्रम डिग्री कॉलेजमघध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. राम जन्मभूमी आंदोलनावेळी त्यांना कॉलेजमधून अटक करुन तुरुंगातही पाठवण्यात आले होते. त्यावेळी त्यांना 18 महिने वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगात सुटल्यानंतर ते नगिना येथील घरी परतले नाहीत. ते थेट विश्व हिंदू परिषदेत जाऊन सहभागी झाले. त्यानंतर ते राम मंदिराच्या निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून काम करीत राहिले. अखेर राम मंदिराच्या निर्माणाची जबाबदारीच त्यांच्याकडे चालून आली. 

हेही वाचा : राम मंदिर ट्रस्टवर शंकराचार्य संतापले अन् म्हणाले, आधी चंपत रायना तेथून हाकला!

राम मंदिर जमीन खरेदीवरच आरोप लावण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे आणि आपचे खासदार संजयसिंह यांनी पत्रकार परिषदेत जमीन व्यवहाराची कागदपत्रे सादर करत भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले होते. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झआले आहे. ट्रस्टने आज यावर स्पष्टीकरण देत जमीन खरेदीमध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. 

काय आहे आरोप?
राम जन्मभूमीच्या जमिनीलगत असलेली एक जमीन पुजारी हरीश पाठक आणि त्यांच्या पत्नीने 18 मार्च रोजी सुल्तान अंसारी आणि रवि मोहन यांना दोन कोटी रुपयांना विकली होती. त्यानंतर काही मिनिटांतच चंपत राय यांनी ट्रस्ट मार्फत हीच जमीन 18.5 कोटी रुपयांना खरेदी केली. या जमिनीत असे काय होते की, दहा मिनिटांतच त्याला सोन्याचा भाव आला, असा आरोप पवन पांडे यांनी केला आहे. 

मंदिर ट्रस्टने आरोप फेटाळले 
ट्रस्टने खरेदी केलेली जमीन मोक्याच्या ठिकाणी असल्याने या जमिनीची किंमत अधिक आहे. या जमिनीच्या खरेदीबाबत दहा वर्षांपासून चर्चा सुरू होती. या व्यवहारामध्ये नऊ जण होते. इतर भागातील जमिनीपेक्षा ही जमीन तुलनेनं स्वस्त आहे. व्यवहार झाल्यानंतर रक्कम थेट बँक खात्यात जमा केल्याचा दावाही ट्रस्टने केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख