तुम्ही हरलात म्हणून भांडण उकरुन काढताय! ममतादीदींचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर - west bengal cm mamata banerjee slams pm narendra modi | Politics Marathi News - Sarkarnama

तुम्ही हरलात म्हणून भांडण उकरुन काढताय! ममतादीदींचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर

वृत्तसंस्था
शनिवार, 29 मे 2021

पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अर्धा तास वाट पाहायला लावली होती. यावरुन राजकारण तापलं आहे. 

कोलकता : यास चक्रीवादळाने (Yaas Cyclone) झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पश्चिम बंगालच्या (West Bengal) दौऱ्यावर गेले होते. त्यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी अर्धा तास वाट पाहायला लावली होती. यावरुन आता राजकारण तापलं आहे. भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जींना यावरुन लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. अखेर ममता बॅनर्जींनी याला उत्तर देत थेट मोदींना लक्ष्य केले आहे. 

केंद्र सरकारकडून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, असा आरोप करुन ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तुम्ही माझा असा अपमान करु नका. आम्हाला राज्यात एकहाती विजय मिळाला आहे. यामुळे तुम्ही असे वागत आहात. तुम्ही सगळ करुन बघितलं पण शेवटी हरलात. यामुळे तुम्ही रोज आमच्याशी भांडण उकरुन काढताय. 

कालच्या घटनेविषयीही ममतांनी खुलासा केला असून, त्या म्हणाल्या की, आम्ही तेथे पोहोचलो त्यावेळी बैठक सुरु झाली नव्हती. एसपीजीने 1 तासानंतर बैठक होईल, असे आम्हाला सांगितले. त्यावेळी मी कॉन्फरन्स रूममध्ये रिकाम्या खुर्च्या पाहिल्या. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची बैठक असताना तेथे भाजप नेते कशाला? केंद्र सरकारला मागील दोन वर्षात संसदेत विरोधी पक्ष नेत्यांची गरज भासली नाही. गुजरातमध्येही विरोधी पक्ष नेत्याला बैठकीला बोलावले नाही. मी नुकसानीचा अहवाल देण्यासाठी पंतप्रधानांना भेटले.  मी हा अहवाल त्यांना दिला आणि तेथून निघण्यापूर्वी त्यांची परवानगी घेतली.

मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी कायदा व सुव्यवस्थेवर भाष्य केले. त्यानंतर केंद्रीय पथकाला राज्यात पाठवण्यात आले. मी पंतप्रधानांना विनंती करते की, त्यांनी मुख्य सचिवांच्या बदलीचा आदेश मागे घ्यावा. आम्हाला राज्यात काम करु द्या. थोडे सौजन्य तुम्ही बाळगावे. केंद्र सरकार राज्याला काम करू देत नाही. बंगालला माझे प्राधान्य आहे. येथील लोकांना कधीही मी  संकटात आणणार नाही. मी इथल्या लोकांचा सुरक्षारक्षक बनून राहीन. जनतेच्या हितासाठी, मी तुमच्या पायाला स्पर्श करण्यास तयार आहे. हा राजकीय सूड थांबवा, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.  

हेही वाचा : मुलगा मरुन 30 दिवस झाले तरी पोलीस तक्रार घेत नाहीत! भाजप आमदाराची व्यथा 

पश्चिम बंगालमध्ये वादळाच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान मोदी जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करण्यासाठी  आले, तेव्हा हा प्रकार घडला. खरे तर ममता या पंतप्रधानांना भेटणार की नाही, याचीच उत्सुकता होती. कारण मोदी यांच्यासोबतच्या बैठकीला तेथील विरोधी पक्षनेते आणि ममता यांचे राजकीय विरोधक सुवेंदू अधिकारी यांनाही निमंत्रण होते. त्यावरून ममता चिडल्या होत्या. त्यामुळेच त्या उशिरा दाखल झाल्याचे सांगण्यात येते.

कलाईकुंड येथे या दोघांची ही भेट झाली. वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मी पंतप्रधानांना दिली आणि त्यानंतर मी पुढील ठिकाणी नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले, असे ममता यांनी ट्विटद्वारे कळविले आहे. पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो मात्र त्यांनी शेअर केलेला नाही. मोदी यांनी पण ममता यांच्यासोबतचा फोटो शेअर केलेला नाही. मात्र ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा फोटो मोदींनी शेअर केला. 

यावरून संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ट्विट  करत  ममतांवर टीका केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेवरून ममता यांच्यावर टीका केली होती. तेथील राज्यपाल जगदिप धनकर यांनी हा काळा दिवस असल्याचे म्हटले होते. या प्रसंगानंतर केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. तेथील मुख्य सचिव अलापन बंदोपाध्याय यांना दिल्लीतील सेवेत बोलावून घेण्यात आले आहे. ते तेथे मुख्य सचिव म्हणून काम पाहू शकणार नाहीत, अशी व्यवस्था केंद्राने केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख