मोठी बातमी : प्रसाद यांचा भाजपमध्ये प्रवेश अन् दुसऱ्याच दिवशी शहांच्या भेटीला योगी - uttar pradesh cm yogi adityanath meets union home minister amit shah | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : प्रसाद यांचा भाजपमध्ये प्रवेश अन् दुसऱ्याच दिवशी शहांच्या भेटीला योगी

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जून 2021

उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) काँग्रेस (Congress)  नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद आहेत. उत्तर प्रदेशमधील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या प्रसाद हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. उत्तर प्रदेशमध्ये पक्षासाठी ब्राह्मण समाजाच्या संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मागील काही काळापासून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या सक्रिय झाल्या आहेत. तेव्हापासून प्रसाद यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. प्रसाद यांनी प्रियांका यांना थेट विरोध केलेला नसला तरी ते नाराज होते. 

उत्तर प्रदेशात मागील काही दिवसांपासून राज्यातील ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याचे चित्र आहे. यामुळे काँग्रेसचा राज्यातील ब्राह्मण चेहरा असलेले जितिन प्रसाद यांचा भाजप प्रवेशासाठी फायद्याचा ठरणार आहे. त्यांच्यावर राज्यात मोठी जबाबदारी देऊन ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. या पार्श्वभूमीवर आज तातडीने 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अमित शहांची भेट घेतली. योगी हे उद्या (ता.11) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. 

हेही वाचा : कपिल सिब्बल म्हणाले, मेलो तरी जाणार नाही! 

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहेत. यामुळे काही दिवसांपूर्वी भाजपचे सरचिटणीस बी.एल.संतोष यांनी उत्तर प्रदेशला भेट दिली होती. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला होता. आता प्रसाद यांच्या पक्षप्रवेशाने भाजपमध्ये वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर पक्ष महत्वाची जबाबदारी सोपवणार, अशी चर्चा सुरू आहे. 
 
राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. याची सुरूवात मध्य प्रदेशातून झाली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. त्यानंतर पुन्हा भाजपचे सरकार येऊन शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते. याचबरोबर शिंदे यांनी राज्यसभा सदस्यत्व मिळाले होते. 

Edited by Sanjay jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख