भाजप प्रवेशाबाबत कपिल सिब्बल म्हणाले, मेलो तरी जाणार नाही! - congress laeder kapil sibal says he will never join bjp in lifetime | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप प्रवेशाबाबत कपिल सिब्बल म्हणाले, मेलो तरी जाणार नाही!

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जून 2021

उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील काँग्रेस (Congress)  नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. काँग्रेसमधील फेरबदलाबाबत पक्ष नेतृत्वाला पत्र लिहिणाऱ्या 23 नाराज नेत्यांमध्ये (G 23) प्रसाद यांचा समावेश होता. याच 23 जणांचा गट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या नेत्यांमधील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी आता या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

आता पक्ष नेतृत्वाने सगळ्यांचे ऐकण्याची वेळ आली आहे, असे माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी ठणकावले आहे. जितिन प्रसाद यांच्याप्रमाणे पाऊल तुम्ही उचलणार का या प्रश्नावर सिब्बल यांनी मेलो तरी नाही, असे ठाम उत्तर दिले. ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये आता सुधारणा करण्याची वेळ आली आहे. याचबरोबर पक्ष नेतृत्वानेही सगळ्यांचे ऐकायला हवेय. जितिन प्रसाद यांच्यासारखा नेता भाजपमध्ये प्रवेश करतो, याचा पक्षाने विचार करावा. 

एखाद्या नेत्याचे काही मुद्दे असतात. त्यावर समाधान झाले तरी फायद्यासाठी तो पक्ष सोडतो. जितिन प्रसाद यांनी पक्ष सोडण्यामागे त्यांचे काही कारण असेल. मी त्यांना दोष देणार नाही. मी ते सोडून जाण्याच्या कारणांना दोष देतो. ते आता कोणत्या तोंडाने म्हणू शकतात की मी 30 वर्षे विरोध केलेली विचारधारा आता स्वीकारली आहे? स्वत:ला नितीमत्ता असलेला पक्ष समजणारा भाजप आता त्यांना प्रसाद यांना घेण्याचे काय समर्थन करेल? अशा प्रकारच्या राजकारणामुळे लोकांचा राजकारणावरील विश्वास उडाला आहे, असे सिब्बल यांनी सांगितले. 

हेही वाचा : आयाराम, गयाराम गेले अन् आता आले प्रसादराम! 

आम्ही मांडलेल्या मुद्द्यांवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. आम्ही हे मुद्दे कायम मांडत राहू. पक्षाने एखाद्या कारणास्तव तुमची गरज नाही, असे सांगितल्यास मी बाहेर पडेन. परंतु, मी मेलो तरी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. माझ्या जन्मापासून भाजपला विरोध करीत आहे. त्यामुळे मी कधीही त्या पक्षात जाणार नाही, अशी ठाम भूमिकाही सिब्बल यांनी घेतली. 

राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. याची सुरूवात मध्य प्रदेशातून झाली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. त्यानंतर पुन्हा भाजपचे सरकार येऊन शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते. याचबरोबर शिंदे यांनी राज्यसभा सदस्यत्व मिळाले होते. 

Edited by Sanjay jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख