एकाच गावातील तब्बल 50 जणांना कोरोना लस न घेताही वाटली प्रमाणपत्रं

सरकारने कोरोना लसीकरणावरील भर वाढवला आहे. असे असले तरी लसीकरणातील गोंधळाचे रोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत.
in uttar pradesh 50 residents given vaccine certificates without vaccination
in uttar pradesh 50 residents given vaccine certificates without vaccination

मैनपुरी : सरकारने कोरोना लसीकरणावरील (Covid Vaccination) भर वाढवला आहे. असे असले तरी लसीकरणातील गोंधळाचे रोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत. आता एकाच गावातील तब्बल 50 जणांना कोरोना लस न देताही ती घेतल्याचे प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. 

उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधील गावात हा प्रकार घडला आहे. मैनपुरीतील तब्बल 50 जणांना कोरोना लस न घेताही ती घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. विशेष बाब म्हणजे ही प्रमाणपत्रे त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट्य ठरवून देण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी चक्क 50 नागरिकांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र वितरीत केले. महत्वाचे म्हणजे या नागरिकांना कोरोना लशीचा एकही डोस मिळालेला नाही. 

मैनपुरीतील लापगावा या गावातील 50 नागरिकांना कोरोना लस घेतल्याच्या प्रमाणपत्राच्या प्रती आरोग्य कर्मचाऱ्यांनी वाटल्या. सरकारने या गावात 24 जून रोजी केलेल्या लसीकरण मोहिमेत या सर्वांचे लसीकरण झाले असेही दाखवण्यात आले आहे. परंतु, एकाचेही लसीकरण झाले नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेतील अनागोंदी कारभार समोर आला आहे. याचा गाजावाजा झाल्यानंतर गावकऱ्यांना नंतर लस देण्यात येईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली होती. परंतु, महिना उलटल्यानंतरही त्यांना लस मिळालेली नाही. 

जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. देशात सध्या 5 कोरोना लशी उपलब्ध आहेत. देशातील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या माध्यमातून या लशीचा पुरवठा होणार आहे.  आधी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या चार लशींचा वापर लसीकरणासाठी होत होता. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com