नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) यूपीएससी परीक्षा न देताही 'बॅकडोअर एंट्री'चा मार्ग खुला केला आहे. केंद्र सरकारच्या 13 मंत्रालयांमध्ये थेट नियुक्तांना मंजुरी देण्यात आली आहे. सहसचिव आणि संचालक दर्जाची ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
यूपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मनुष्यबळ व प्रशिक्षण विभागाने दिलेल्या मनुष्यबळाच्या गरजेनुसार थेट नियुक्तीने करावयाची भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या 13 मंत्रालयातील पदे थेट नियुक्तीने भरण्यात येणार आहेत. यात सहसचिव आणि संचालक दर्जाची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
'यूपीएससी'च्या उमेदवारांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
हुशार आणि उत्साही भारतीयांना राष्ट्रबांधणीच्या कार्यात सहभागी करुन घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालय, वित्तीय सेवा, आर्थिक कामकाज, कृषी व शेतकरी कल्याण, विधी व न्याय, शालेय शिक्षण व साक्षरता, उच्च शिक्षण, ग्राहक कामकाज, अन्नधान्य व सार्वजनिक वितरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, रस्ते परिवहन व महामार्ग, नागरी हवाई वाहतूक, कौशल्य विकास आदी मंत्रालयांमध्ये थेट नियुक्तीने पदे भरण्यात येणार आहेत.
ही सर्व पदे सहसचिव आणि संचालक दर्जाची आहेत. ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. याबाबतची जाहिरात यूपीएससीच्या संकेतस्थळावर उद्या (ता.6) प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 6 फेब्रुवारी ते 22 मार्च या कालावधीत यासाठी अर्ज करता येईल. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व माहिती अचूक असेल याची काळजी उमेदवारांनी घ्यावी, असे यूपीएससीने नमूद केले आहे.
Edited by Sanjay Jadhav