मोठी बातमी : नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत अटक होणार नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन गदारोळ उडाला आहे.
union minister narayan rane will not be arrested till 17 september
union minister narayan rane will not be arrested till 17 september

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन पोलिसांनी काल (ता.24) अटक केली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. या प्रकरणी दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, यासाठी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली होती. यावर उच्च न्यायालयाने राणेंना अटकेपासून 17 सप्टेंबरपर्यंत संरक्षण दिले आहे.   

नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, यासाठी राणेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचबरोबर पोलिसांनी आपल्यावर कोणतीही कारवाई करण्यापासून रोखावे, अशी विनंतीही त्यांनी केली होती. यावर महाराष्ट्र सरकारने राणेंवर 17 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, अशी हमी उच्च न्यायालयात दिली. नंतर आपल्या विरुद्ध दाखल सगळ्याच गुन्ह्यात कारवाईपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी राणेंनी न्यायालयात केली. यावर सरकारने याचिकेत केवळ नाशिकच्या गुन्ह्याचा उल्लेख असल्याचा दाखला देत इतर गुन्ह्यांत अशी हमी देण्यास नकार दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी 17 सप्टेंबरला होणार आहे. 

महाड न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. पाटील यांच्या न्यायालयात राणेंना काल हजर करण्यात आले. राणेंची 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. त्यांनी 31 ऑगस्ट व 13 सप्टेंबरला पोलिसांसमोर हजेरी लावण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या वेळी राणेंनी राजकीय हेतूने अटक केल्याचा आरोप केला. तसेच, कोणतीही पूर्वसूचना न देता अटक केल्याचा मुद्दा उपस्थित केला. राणेंना प्रकृतीचे कारण आणि केंद्रीय मंत्री असल्याचा मुद्दाही मांडला होता. 

दरम्यान राणेंना अटक करण्यासाठी अनेक ठिकाणच्या पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राणेंना जामीन देण्यास नकार दिला. तांत्रिक मुद्द्यावर हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. नाशिकमध्ये गुन्हा दाखल असताना रत्नागिरीत जामीन अर्ज का, या मुद्द्यावर हा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर राणेंच्या वतीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी अर्ज करण्यात आला होता. परंतु, उच्च न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळातच राणेंना अटक करण्यात आली.

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी संगमेश्वरमधील गोळवली गावात पोलीस दाखल झाले होती. पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेची कारवाई पोलिसांनी सुरू केली. राणेंची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथकही दाखल झाले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर राणेंना अटक करुन पोलीस घेऊन गेले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com