विद्यार्थ्याचा कोरोनाने मृत्यू झाला अन् प्राचार्य म्हणाले, सत्तांध नेत्यांमुळेच हे घडतंय! - st stephens college principle slams politicians for covid deaths in country | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

विद्यार्थ्याचा कोरोनाने मृत्यू झाला अन् प्राचार्य म्हणाले, सत्तांध नेत्यांमुळेच हे घडतंय!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 मे 2021

कॉलेजचे प्राचार्य जॉन वर्गीस यांची पोस्ट व्हायरल झाली असून, सत्तेसाठी सामान्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या नेत्यांचा बुरखा त्यांनी फाडला आहे. 

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधील (St Stephens College)  पहिल्या वर्षातील विद्यार्थी सत्यम झा (वय 18) (Satyam Jha) कोरोनामुळे (Covid-19) मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील कोटा येथे खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. यावर कॉलेजचे प्राचार्य जॉन वर्गीस (John Varghese) यांनी कॉलेजच्या संकेतस्थळावर एक भावनिक पोस्ट लिहिली असून, सत्यमच्या मृत्यूसाठी देशातील अंध नेत्यांना जबाबदार धरले आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली असून, सत्तेसाठी सामान्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या नेत्यांचा बुरखा त्यांनी फाडला आहे. 

सत्यम हा बीए (ऑनर्स) इतिहासचा विद्यार्थी होता. काही दिवसांपूर्वी तो कौटुंबिक कामानिमित्त दिल्लीहून कोटा येथे गेला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तो ऑनलाइन क्लासेला हजेरी लावत होता. नंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. तो आठवडाभर व्हेंटिलेटरवर होता. काही दिवसांपूर्वीच त्यांची गांधी आंबेडकर स्टडी सर्कलच्या सदस्यपदी निवड झाली होती.

प्राचार्य जॉन वर्गीस यांनी म्हटले आहे की, युद्धपिपाससू आणि अंध नेते हे सामान्यांच्या हालअपेष्टांपासून दूर आहेत. सामान्यांच्या मरणाचे त्यांना काही सोयरसुतक नाही. त्यांच्यामुळे आपणही क्रूर आणि असंवेदनशील बनत आहोत. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूपेक्षा सत्ता महत्वाची आहे का? नक्कीच नाही. 

त्याची स्वप्ने आणि त्यांच्या पालकांनी पाहिलेली स्वप्ने अखेर संपली आहेत. त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या आकांक्षाही त्याच्या मृत्यूने संपुष्टात आल्या आहेत. त्याच्या आत्माला शांती लाभो, अशी प्रार्थना आम्ही करतो, असे वर्गीस यांनी म्हटले आहे.  

हेही वाचा : भारतात सरकारी आकड्यांच्या पाचपट अधिक कोरोना मृत्यू; न्यूयॉर्क टाईम्सचा दावा  

देशात 24 तासांत 3 हजार 660 मृत्यू 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 1 लाख  86  हजार 364 नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 660 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 75 लाख 55 हजार 457 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3 लाख 18 हजार 895 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 44 दिवसांत पहिल्यांदाच रोजची रुग्णसंख्या 2 लाखांच्या खाली आली आहे.  देशातील रुग्णसंख्या याआधी 25 मे रोजी 2 लाखांच्या खाली आली होती. असे असले तरी मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख