भारतात सरकारी आकडेवारीच्या पाचपट अधिक कोरोना मृत्यू; न्यूयॉर्क टाईम्सचा दावा - india covid death toll is higher than official figures says new york times | Politics Marathi News - Sarkarnama

भारतात सरकारी आकडेवारीच्या पाचपट अधिक कोरोना मृत्यू; न्यूयॉर्क टाईम्सचा दावा

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढीचा वेग काहीसा कमी झाला असला तरी जगात रोजचे सर्वाधिक कोरोना मृत्यू भारतात होत आहेत. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19)  रुग्णसंख्येतील (Patients) वाढीचा वेग काहीसा कमी झाला असला तरी जगात रोजचे सर्वाधिक कोरोना मृत्यू  (Covid Deaths) भारतात होत आहेत. देशात आतापपर्यंत कोरोनामुळे 3 लाख 15 हजार जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. न्यूयॉर्क टाईम्सने (NewYork Times) मात्र, ही आकडेवारी पाचपट असल्याचा दावा केला आहे. भारतात कोरोनामुळे 16 लाख जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे की, कोरोनामुळे भारतात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार 3 लाख 15 हजार मृत्यू झाले आहेत. प्रत्यक्षात कोरोना मृत्यू पाचपट अधिक आहेत. भारतात कोरोनामुळे सुमारे 16 लाख जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. केवळ भारतच नव्हे तर अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांनी कोरोना मृत्यू कमी नोंदवले आहेत. मागील वर्षी सगळ्यात पहिल्यांदा चीनमध्ये कोरोना संसर्ग झाला त्यावेळी चीननेही मृत्यूचे आकडे लपवले होते. 

केंद्र सरकारने मात्र, न्यूयॉर्क टाईम्सचा हा दावा फेटाळला आहे. सरकारने म्हटले आहे की, न्यूयार्क टाईम्सचा दावा हा केवळ अंदाजाच्या आधारे केलेला आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. तसेच, त्या दाव्याला कोणताही पुरावा नाही. त्यामुळे हा दावा निराधार आणि खोटा ठरतो. 

देशात 24 तासांत 3 हजार 847 मृत्यू 
देशात मागील 24 तासांत 2 लाख 11 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 847 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 73 लाख 69 हजार 093 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3 लाख 15 हजार 235 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर प्रथमच 17 मेपासून रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. देशातील कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच वेगाने रुग्णसंख्येत होणारी वाढ आता कमी होऊ लागली आहे. यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचे सूर सरकारमधून व्यक्त होत आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा : फॅक्ट चेक : फ्रिजमधील भाज्या खाल्ल्याने ब्लॅक फंगसचा संसर्ग होतो का? 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून, आता ती 24 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 24 लाख 19 हजार 907 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 11.63 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 90.01 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 46 लाख 33 हजार 951 आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख