देशातील प्रत्येकाला कोरोना लस देणे अशक्य; अदर पूनावालांनी सांगितलं कारण... - sii ceo adar poonawalla says need 3 thousand crore for increasing vaccine production | Politics Marathi News - Sarkarnama

देशातील प्रत्येकाला कोरोना लस देणे अशक्य; अदर पूनावालांनी सांगितलं कारण...

वृत्तसंस्था
बुधवार, 7 एप्रिल 2021

देशाला लशीचा पुरवठा करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. खुद्द 'सिरम'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी याची कबुली दिली आहे. 
 

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचली आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला असला तरी लशीचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर देशाला लशीचा पुरवठा करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. खुद्द 'सिरम'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी याची कबुली दिली आहे. 

सिरमच्या उत्पादन प्रकल्पावर मोठा ताण आला आहे, असे सांगून अदर पूनावाला म्हणाले की, सिरमकडून दर महिन्याला 6 ते 6.5 कोटी डोसचे उत्पादन होत आहे. आतापर्यंत आम्ही केंद्र सरकारला 10 कोटी डोस दिले असून, 6 कोटी डोस निर्यात केले आहेत. देशातील प्रत्येकाला लस द्यायची झाल्यास तेवढे उत्पादन आता आम्ही सध्या घेऊ शकत नाही. सर्व जगाला लस हवी आहे. परंतु, आम्ही सध्या भारताच्या गरजेवर  लक्ष केंद्रित केले आहे. असे असले तरी प्रत्येक भारतीयाला लस देणे आम्हाला सध्या तरी शक्य होत नाही.   

सिरमकडून सवलतीच्या दरात केंद्र सरकारला कोरोना लस दिली जात आहे. यामुळे आम्हाला लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी 3 हजार कोटी रुपयांची गरज आहे. जूनपर्यंत उत्पादन वाढवायचे झाल्यास एवढा मोठा निधी लागेल. आम्ही केंद्र सरकारला 150 ते 160 रुपयांना लस देत आहोत. या लशीची सर्वसाधारण किंमत 20 डॉलर (सुमारे 1 हजार 500 रुपये) आहे. केंद्र सरकारने विनंती केल्यामुळे आम्ही सवलतीच्या दरात लस देत आहोत. यामुळे आम्हाला फारसा नफा होत नाही. याचा परिणाम लशीचे उत्पादन वाढवण्यावर होत आहे, असे पूनावाला यांनी सांगितले. 

हेही वाचा : कोरोना लस घेताय...सिरमच्या अदर पूनावालांनी केली मोठी घोषणा 

आम्हाला 3 हजार कोटींचा निधी मिळाल्यास लशीचे उत्पादन तीन महिन्यांत वाढू शकेल. याबाबत आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने निर्णय न घेतल्यास आम्ही बँकांकडे कर्जासाठी जाऊ, असे पूनावाला यांनी स्पष्ट केले. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. यातील कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारने वाढवून 6 ते 8 आठवडे केले आहे. याआधी या दोन्ही लशींसाठी दोन डोसमधील अंतर 4 आठवडे होते. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख