कोरोना लस घेताय...'सिरम'च्या अदर पूनावालांनी केली मोठी घोषणा - adar poonawalla says covishield is more effective if doses given in 2 to 3 months gap | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना लस घेताय...'सिरम'च्या अदर पूनावालांनी केली मोठी घोषणा

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 एप्रिल 2021

देशभरात आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. सरकारने लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. 
 

नवी दिल्ली : देशभरात आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णसंख्या विक्रमी पातळीवर गेल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. देशात 1 एप्रिलपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, यात 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास येत आहे. सरकारने लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी मोठी घोषणा केली आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. यातील कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारने वाढवून 6 ते 8 आठवडे केले आहे. याआधी या दोन्ही लशींसाठी दोन डोसमधील अंतर 4 आठवडे होते. त्यामुळे आधी पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी नोंदणी आपोआप होत होती. आता दोन्ही लशींच्या दोन डोसमधील अंतर वेगवेगळे असल्याने आपोआप नोंदणी बंद करण्यात आली आहे. नागरिकांना पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या डोससाठी नोंदणी करावी लागेल. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

अदर पूनावाला यांनी म्हटले आहे की, तुम्ही लस घेतली असेल तर दोन डोसमध्ये जेवढे अधिक अंतर असेल तेवढी तिची परिणामकारकता वाढेल. लशीच्या चाचण्यांमध्ये एक महिन्याच्या अंतराने देण्यात आलेल्या डोसमध्ये लशीची परिणामकारकता ६० ते ७० टक्के आढळली आहे. याचवेळी २ ते ३ महिन्यांच्या अंतराने दिलेले दोन डोस अधिक परिणामकारक ठरत आहेत. यात लशीची परिणामकारकता ९० टक्क्यांवर जात आहे. 

लशीचा एक डोस घेतलेल्या ५० वर्षांखालील व्यक्तींमध्ये लस अधिक प्रभावी ठरत आहे. लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर महिनाभराने कोरोनापासून मिळणारे संरक्षण हे कोरोनाबाधित रुग्णाला मिळणाऱ्या संरक्षणापेक्षा अधिक आहे. एका डोसमध्ये सुमारे ७० टक्के लोकांना संरक्षण मिळत आहे. परंतु, दीर्घकालीन संरक्षणासाठी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे, असे पूनावाला यांनी स्पष्ट केले. 

१ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जात आहे. यासाठी सरकारने नोंदणीचे दोन पर्याय ठेवले आहेत. यासाठी सरकारी को-विन अॅपवर ऑनलाइन नोंदणी करण्याचा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय हा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचा असेल. मात्र, प्रत्यक्ष नोंदणीसाठी नागरिकांना दुपारी 3 वाजल्यानंतर लसीकरण केंद्रावर जावे लागेल. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख