काँग्रेसमध्ये येण्याची गडकरींना होती खुली ऑफर! 

काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांनी पक्ष सोडण्यास सांगितले होते.
Shrikant Jichkar gave offer to quit BJP says Nitin Gadkari
Shrikant Jichkar gave offer to quit BJP says Nitin Gadkari

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर देण्यात आली होती. गडकरींनीच याबाबतचा किस्सा एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांनी पक्ष सोडण्यास सांगितले होते. पण मी माझी विचारधारा कधीच सोडणार नाही, असं उत्तर जिचकार यांना दिल्याची आठवण गडकरी यांनी सांगितली. (Shrikant Jichkar gave offer to quit BJP says Nitin Gadkari)

जयपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात गडकरी यांनी सोमवारी राजकारणावर मोकळेपणानं लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकीची एक आठवणही सांगितली. ते म्हणाले, मी विद्यापीठामध्ये विद्यार्थी नेता होतो. त्यावेळी काँग्रेसचे डॉ. श्रीकांत जिचकार हे माझे मित्र होते.  विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकीत आम्ही दोघे एकमेकांच्या विरोधात उभे होते. या निवडणुकीत मी सहा मतांनी हरलो. त्यावेळी ते मला म्हणाले, नितीन तू खूप चांगला आहेत. पण तुझ्या पक्षाचं काही भविष्य नाही. हा पक्ष सोडा अन् काँग्रेसमध्ये या. तुमचं भविष्य चांगलं असेल.'

त्याकाळात ज्याचं डिपॉझिट जप्त होणार नाही, त्यांचा सत्कार आम्ही करत होतो. कारण त्यातच विजय वाटत होता. आजच्यासारखी परिस्थती त्यावेळी नव्हती. जिचकार यांनी विचारल्यानंतर मी त्यांना म्हटलं, आपण हे बोलला, त्याबद्दल आभारी आहे. पण मी माझी विचारधारा कधीच सोडणार नाही. जे होईल ते होईल,' असं गडकरी यांनी सांगितलं. आता प्रश्न हा आहे की, आपल्या मुलभूत गोष्टींना आपण सोडणार की नाही. असं होऊ नये. जी विचारधारा आहे, संघटन आहे, त्याविषयी आपण प्रामाणिक राहायला हवं, असंही गडकरी म्हणाले.  

राजकारणात कधी हार-कधी जीत, कधी आनंद, मान-सन्मान मिळतो. तर कधी निराशा येते. राजकारणाचा अर्थ काय आहे, यावर विचार करावा लागेल. राजकारण हे सामाजिक, आर्थिक परिवतर्नाचे प्रभावी साधन आहे. समाजाच्या शेवटच्या स्तरातील व्यक्तीचं परिवर्तन करून राष्ट्र घडवणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. राजकारणात तर राजकारण होणारच. आजकाल राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण समजलं जात आहे. आपण इथे मंत्री बनण्यासाठी किंवा पोलिस सॅल्युट मारतील म्हणून आलो नाही. देशातील गरिबी, बेरोजगारी, महागाईमधून जनतेला मुक्ती देऊ इच्छितो, असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.  

समाजाचं कल्याण करणाऱ्या क्षेत्राचं गुणात्मक परिवर्तन करायचं आहे. मतभेद असले तरी चालतील मनभेद होऊ नयेत, असं अटबिहारी वाजपेयी म्हणायचे. विचारधारेचा सन्मान करणं, हा लोकशाहीचा आत्मा आहे. दोष जनतेला देऊन चालणार नाही. राजकारण्यांना स्वत:कडं पहायला हवं. आपण जेवढे चांगले तेवढी लोकशाही चांगली असेल. विचारधारेशी आपण प्रामाणिक राहायला हवं. आपण कसा वागतो, यावरच लोकशाहीचं भविष्य अवलंबून असेल, असंही गडकरी यांनी नमूद केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com