राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत न उतरण्याचं शरद पवारांनी सांगितलं कारण... - sharad pawar says he is not candidate for president election | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत न उतरण्याचं शरद पवारांनी सांगितलं कारण...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जुलै 2021

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी गांधी परिवाराची भेट घेतल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. 

नवी दिल्ली : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुढील लोकसभा निवडणुकीतील नेतृत्वाबाबत अथवा राष्ट्रपती पदाबाबतच्या उमेदवारीविषयी ही भेट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर पवारांनी अखेर खुलासा केला आहे. 

प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी गांधी परिवारांची भेट घेतली होती. यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीतील नेतृत्वाबाबत अथवा राष्ट्रपती पदासाठी पवारांच्या उमेदवारीबाबत ही भेट असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. यावर अखेर पवारांनीच खुलासा केला आहे. किशोर यांच्याशी माझी दोन वेळा भेट झाली आहे परंतु, यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे पवारांनी स्पष्ट केले. 

पवार म्हणाले की, किशोर यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करण्याचे बंद केल्याचे मला सांगितले होते. ते मला दोनदा भेटले होते परंतु, ही भेट त्यांच्या कंपनीबाबत होती. लोकसभेच्या 2024 मधील निवडणुकीबाबत अथवा राष्ट्रपती पदाबाबतच्या निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झालेली नव्हती. 

मी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नाही. कारण एकाच पक्षाचे तीनशेहून अधिक खासदार असतील तर निवडणुकीचा निकाल काय लागेल हे सर्वांना माहिती आहे. हे मलाही माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाचा उमेदवार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. पुढील लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांची आघाडी करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. परिस्थिती कायम बदलत असते, असेही पवारांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा : किशोर यांचे काँग्रेसमध्ये स्वागत! राहुल गांधींच्या निकटवर्तीय नेत्याचे ट्विट अन् डिलिट 

पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांत एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत किशोर रणनीतीकार म्हणून लक्षवेधी कामगिरी केली होती. बंगालमध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींची सत्ता आणून भाजपला धूळ चारली होती. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या आणि भाजपने अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत ममतांचा विजय झाला होता. किशोर यांनी तमिळनाडूत द्रमुकचे एम.के.स्टॅलिन यांच्या विजयात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. 

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून काम करणार नसल्याचे याआधीच जाहीर केले आहे. परंतु, त्यांची आयपॅक ही सल्लागार कंपनी पंजाबमध्ये आधीपासूनच मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासाठी काम करत आहे. पंजाबमध्ये अमरिंदरसिंग विरुद्ध नवज्योतसिंग सिद्धू, असा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर किशोर यांची गांधी परिवाराशी भेट झाल्याची चर्चा सुरू होती. परंतु, आता वेगळेच तपशील समोर येऊ लागले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख