पवारांनी आजोबांचं वाचण्याचा सल्ला दिला अन् राज ठाकरेंनी उताराच दिला!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला होता. यावरुन वाद निर्माण झाला आहे.
raj thackeray tweets quotes of prabodhankar thackeray
raj thackeray tweets quotes of prabodhankar thackeray

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जन्मानंतर राजकारणात जातीयवाद वाढला, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज ठाकरे यांना त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला होता. आता राज यांनी त्यांच्या आजोबांच्या पुस्तकातील उताराच ट्विट करीत पवारांना उत्तर दिले आहे.  

राज ठाकरे यांनी ट्विटरवर प्रबोधनकारांच्या पुस्तकातील एक वचन उद्धृत केले आहे. त्यात म्हटले आहे की, जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही... जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय!  : प्रबोधनकार ठाकरे, 'माझी जीवनगाथा' (पाने २८०-२८१)

राज ठाकरे यांनी नाव न घेता पवारांवर निशाणा साधला असून, याला आता राष्ट्रवादीही उत्तर देण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. ठाकरे यांनी काल (ता.20) पुण्यात पत्रकारांशी बोलताना याविषयीची भूमिका पुन्हा सविस्तरपणे मांडली होती. ते म्हणाले होते की, मी जे बोललो त्याचा प्रबोधनकार ठाकरे माझे आजोबा यांच्या पुस्तकांचा काय संबंध होता ते मला सांगा. अजूनही आपण जातीपातीत खितपत पडलोय. जात ही गोष्ट शतकानुशतके आहे. सगळीकडेच आहे. मात्र 99 सालापासून जातीपतींचा द्वेष वाढला आणि राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर वाढला, हे सगळ्यांना माहितीय. सर्व पक्षांना माहितीय. मी फक्त बोललो. 

प्रबोधनकारांची सर्व पुस्तके मी वाचली आहेत. त्यांचे विचार त्या त्या कालानुसार होते, प्रबोधनकारांचे विचार पाहिजे ते घ्यायचा आणि बाकीचं सोडून द्ययाच असं सुरु, असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाने मोर्चे काढले, त्यांना आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्टपणे सांगा त्यांना. या मुद्यावरून माथी भडकवून, निवडणुकीला मतं मिळतात त्यापलीकडे दुसरं काही सुरू नाही, असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले होते.

राज ठाकरे यांचे इतिहासाचे आकलन बाबासाहेब पुरंदरे यांच्या पलीकडे नसल्याचा टोला संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी लगावला होती. त्यावर राज ठाकरे म्हणाले होते की, ज्यांचं काही आकलनचं नाही. त्यावर काय बोलायचं? मी काय वाचतोय हे मला आणि माझ्या पक्षाला माहिती आहे. राजकारणासाठी हे एजंट नेमले गेले आहेत. त्यांना हेच हवंय. मी प्रबोधनकार ठाकरे वाचले आहेत. य़शवंतराव चव्हाण यांच्याही पुस्तकाचे वाचन केले आहे. त्यांचीही विचारधारा समजून घेतली आहे. पण आपण किती तुटत जायचं याला काही मर्यादा आहे की नाही? उत्तर प्रदेशमध्ये उघडपणे जाती विचारल्या जातात. असा महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे का?  

माझ्यावर  भूमिका बदलण्याचा आरोप होता. मी  काय भूमिका बदलली? शरद पवारांच्या एका वाढदिवशी मी त्यांच्याबद्दल एक भाषण केले होते. वाढदिवसाचा दिवस पाहता काही गोष्टी राखून ठेवल्या पाहिजेत, असे तेव्हा मी म्हणालो होता. वाढदिवस असतो तेव्हा चांगले बोलतो. तसेच पवारांविषयी बोललो. पण काही गोष्टी आता उघडपणे बोलल्या. पुण्यात त्यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत त्यांना महाराष्ट्रचा मूळ विचार कशात आहे, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी अपेक्षेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मूळ असल्याचे त्यांनी सांगितले होते, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com