भारतीयांचं अपहरण नव्हे तर तालिबाननं दिली मेजवानी!

अफगाणिस्तानमध्ये हजारहून अधिक भारतीय नागरिक अडकले आहेत. सुमारे 150 भारतीयांचे तालिबानने अपहरण केल्याची चर्चा सुरू झाली होती.
taliban offered lunch to 150 indian citizens in kabul
taliban offered lunch to 150 indian citizens in kabul

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) पुन्हा एकदा तालिबानची (Taliban) राजवट सुरू झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये हजारहून अधिक भारतीय (Indians) नागरिक अडकले आहेत. या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताचे (India) प्रयत्न सुरू असताना सुमारे 150 भारतीयांचे तालिबानने अपहरण केल्याचे वृत्त आले होते. प्रत्यक्षात तालिबानने या भारतीय नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी करुन आणि त्यांना जेवण देऊन सोडले आहे. 

काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावरुन तालिबानने सुमारे 150 भारतीयांचे अपहरण केले, असे वृत्त आले होते. याचा तालिबानने इन्कार केला आहे. या भारतीयांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. विमानतळाजवळच्या पोलीस ठाण्यात ही तपासणी करण्यात आली. त्यानंतर या सर्व भारतीयांना तालिबानकडून जेवण देण्यात आले. यानंतर त्यांना विमानात बसवण्यासाठी विमानतळावर पाठवण्यात आले आहे. लवकरच हे सर्वजण भारतात परत येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

आज सकाळीच भारताने आपल्या 85 नागरिकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढले. त्यांना विमानाने ताजिकीस्तानमध्ये नेण्यात आले. तेथून ते भारताकडे रवाना होणार आहेत. उरलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी दुसरे विमान काबूल विमानतळावर तयार होते. त्यानंतर काही तासांतच तालिबानने विमानतळाच्या प्रवेशद्वारावरुन सुमारे 150 भारतीयांचे अपहरण केल्याचे वृत्त आले होते. नंतर हे अपहरण नसून, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. 

भारताने अफगाणिस्तानमधील दूतावासातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परत आणले आहे. सध्या सुमारे एक हजार भारतीय नागरिक अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. यातील 200 जण हे शीख आणि हिंदू असून, त्यांनी काबूलमधील गुरूद्वारात आश्रय घेतला आहे. भारतीय नागरिक हे अफगाणिस्तानमधील अनेक शहरांत विखुरलेले आहेत. त्यांनी दूतावासाकडे नोंदणी न केल्याने युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधून त्यांना शोधून परत आणणे अवघड बनले आहे, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. 

तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरादर अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो. तालिबान्यांनी 15 ऑगस्टला सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला.

अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांपासून असलेले अमेरिकेचे सैन्य तेथून परतल्यानंतर पुन्हा एकदा तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अध्यक्ष बायडन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे संपूर्ण सैन्य माघारी बोलावण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत ठरवली होती. त्याआधी दोन आठवडे तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com