मंत्रिमंडळाच्या मेगाविस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची चतु:सूत्री - prime minister narendra modi cabinet expansion likely today | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्रिमंडळाच्या मेगाविस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची चतु:सूत्री

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार आज होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार आज होण्याची शक्यता आहे. मोदींकडून सुमारे 28 जणांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, असा अंदाज आहे. या मंत्रिमंडळ विस्तारासाठी मोदींनी चतु:सूत्री ठरवली असून. त्यानुसार हा विस्तार होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी या मंत्रिमंडळ विस्तारासाठी चतु:सूत्री ठरवली आहे. यात पहिला मुद्दा म्हणजे ओबीसींना जादा प्रतिनिधित्व देणे. दुसरा मुद्दा चांगला प्रशासकीय अनुभव असलेल्या राज्यांतील नेत्यांना केंद्रात आणणे. तिसरा मुद्दा एकूणच मंत्रिमंडळाचे सरासरी वय कमी करणे आणि चौथा मुद्दा व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या तज्ञ व्यक्तींना संधी देणे. या चार मुद्द्यांवर आजचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

सध्या मंत्रिमंडळातील मागास समाजातील प्रतिनिधींची संख्या बाराच्या आसपास आहे. ओबीसींनी जादा प्रतिनिधित्व आणि इतर छोट्या समाजघटकांना स्थान देऊन ही संख्या 25 पर्यंत नेण्याचा प्रयत्न राहील. देशभरातील ओबीसींनी भाजपकडे ओढून घेण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात झुकते माप देण्याची खेळी खेळण्यात येईल. याचबरोबर उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ब्राह्मण समाजाचेही प्रतिनिधित्व वाढवण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा : जो हुआ सो हुआ..नितीशकुमार म्हणाले, आदरणीय मोदी देतील ते कबूल

केंद्रीय मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात परंतु, सध्या ही संख्या 53 आहे. यामुळे 28 नवीन सदस्यांचा समावेश होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी मंत्रिमंडळातील सदस्यांना गटाने बोलावून त्यांच्याशी चर्चाही केली होती. विस्तारात प्रादेशिक आणि जातीय समतोल राखला जाणार आहे. याचबरोबर पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकात डोळ्यामसोर ठेवून विस्तार केला जाईल. तसेच, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांना जादा प्रतिनिधित्व दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या आहेत. राज्यातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट, तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री असे सहा मंत्री  आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, पण महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर सावंत यांना पक्षाच्या आदेशनांतर  मंत्रिपद सोडावे लागले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख