जो हुआ सो हुआ...नितीशकुमार म्हणाले, आदरणीय मोदी देतील ते कबूल! - nitish kumar says whatever narendra modi give will be accepted | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

जो हुआ सो हुआ...नितीशकुमार म्हणाले, आदरणीय मोदी देतील ते कबूल!

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार होणार आहे. विस्ताराच्या हालचालींना गती मिळाली आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्या पक्षाला स्थान नको, अशी भूमिका 2019 मध्ये घेणारे बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) आता नरमले आहेत. आता मोदी देतील ते आपल्याला कबूल असेल, असे नितीशकुमार यांनी म्हटले असून, संयुक्त जनता दलाच्या (JDU) मंत्रिमंडळ प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा 2019 मध्ये सांभाळली. त्यावेळी भाजपने घटक पक्षांना प्रत्येकी एकच मंत्रिपद दिले होते. यामुळे जेडीयूने केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. लोकसभेतील संख्याबळाच्या आधारावर मंत्रिपदे मिळावीत, अशी भूमिका नितीशकुमार यांनी त्यावेळी घेतली होती. आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार होणार असून, नितीशकुमार यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, जे झाले ते झाले. आता आदरणीय पंतप्रधान ठरवतील ते आम्हाला मान्य असेल. 

या पार्श्वभूमीवर जेडीयूचे ज्येष्ठ नेते आर.सी.पी.सिंह हे दिल्लीत दाखल झाले असून, ते भाजपशी मंत्रिमंडळातील स्थानाबाबत अंतिम चर्चा करतील. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयूने चार मंत्रिपदांची मागणी केली आहे. लोकसभेतील संख्याबळानुसार मंत्रिपदे हवीत, असा आग्रह जेडीयूने धरला आहे. बिहारमध्ये भाजपचे 17 तर जेडीयूचे 16 खासदार आहेत. भाजपला 5 मंत्रिपदे असतील तर जेडीयूला 4 मंत्रिपदे हवीत, अशी भूमिका घेण्यात आली आहे. 

जेडीयूचे ज्येष्ठ नेते आर.सी.पी.सिंह हे दिल्लीत जेडीयूच्या कोट्यातील मंत्रिपदांबाबत भाजपशी चर्चा करीत आहेत. बिहारमधून केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपचे उच्च वर्णीय समाजातील चार आणि एक यादव मंत्री आहेत. याचवेळी जेडीयूला मागास जाती आणि महादलितांना संधी द्यायची आहे. अद्याप भाजप नेतृत्वाने जेडीयूच्या मागणीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा : विस्ताराची चर्चा...खासदारांनी कुर्ता खरेदी केला अन् म्हणाले, राज को राज रहने दो! 

केंद्रीय मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात परंतु, सध्या ही संख्या 53 आहे. यामुळे 28 नवीन सदस्यांचा समावेश होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ मंत्र्यांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासोबत आज सायंकाळी 5 वाजता बैठक आयोजित केली होती. ती बैठक रद्द करण्यात आली आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख