मोदींच्या मंत्रिमंडळातील या आहेत सर्वांत गरीब मंत्री..अजूनही करतात शेती - pratima bhoumik from tripura is low asset minister in union cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

मोदींच्या मंत्रिमंडळातील या आहेत सर्वांत गरीब मंत्री..अजूनही करतात शेती

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. यात प्रतिमा भौमिक या सर्वांत गरीब मंत्री ठरल्या आहेत. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार झाला आहे. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 78 झाली आहे. यातील आठ मंत्र्यांची संपत्ती 1 कोटी रुपयांहून कमी आहे. नव्या मंत्रिमंडळात सर्वाधिक गरीब मंत्री प्रतिमा भौमिक (Pratima Bhoumik) असून, त्यांची संपत्ती केवळ 6 लाख रुपय आहे, अशी माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालातून समोर आली आहे. त्या त्रिपुरातील पहिल्या केंद्रीय मंत्री ठरल्या असून, त्यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्रीपद आहे.   

एडीआर ही निवडणूक हक्क संस्था आहे. निवडणूक लढवताना उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे ही संस्था अहवाल प्रसिद्ध करते. यात उमेदवारांची संपत्ती, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि इतर गोष्टींचा समावेश असतो. मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांचा शपथविधी 7 जुलैला झाला. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 78 वर पोचली आहे. नव्या मंत्रिमंडळात 1 कोटी रुपयांपेक्षा कमी संपत्ती असलेल्या मंत्र्यांची संख्या 1 कोटी रुपयांहून कमी आहे. 

नव्या मंत्रिमंडळात सर्वांत कमी संपत्ती असलेल्या मंत्र्यांमध्ये त्रिपुरातील प्रतिमा भौमिक असून, त्यांची संपत्ती केवळ 6 लाख रुपये आहे. पश्चिम बंगालमधील जॉन बारला यांची संपत्ती 14 लाख रुपये, राजस्थानमधील कैलास चौधरी यांची संपत्ती 24 लाख रुपये, ओडिशातील विश्वेश्वर टु़डू यांची संपत्ती 27 लाख तर महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले व्ही. मुरलीधरन यांची संपत्ती 27 लाख रुपये आहे. आसामधील रामेश्वर तेली यांची संपत्ती 43 लाख, पश्चिम बंगालमधील शंतनू ठाकूर यांची संपत्ती 52 लाख आणि बंगालमधीलच निसिथ प्रामाणिक यांची संपत्ती 96 लाख रुपये आहे, असे एडीआरच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

हेही वाचा : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात राणेंच्या डोक्यावर सर्वाधिक कर्ज 

नव्या मंत्रिमंडळातील सर्वांत गरीब मंत्री ठरलेल्या प्रतिमा भौमिक या शेतकरी आहेत. शपथविधीवेळीही त्या खादीची साडी आणि स्लिपर घालून आल्या होत्या. त्रिपुराचे तत्कालीन मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्याविरोधात त्या 1998 आणि 2018 मध्ये लढल्या होत्या. परंतु, दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला होता. त्या विज्ञान शाखेच्या पदवीधर आहेत. त्या 1991 पासून भाजपचे काम करीत आहेत. त्यांनी मागील लोकसभा निवडणुकीतून पश्चिम त्रिपुरा मतदारसंघातून तब्बल 3 लाख 5 हजार 689 मतांच्या मताधिक्याने विजय मिळविला होता. त्या अजूनही शेती करतात आणि त्यांची भारत - बांगलादेश सीमेनजीक शेती आहे. त्यांचे वडील शिक्षक होते तर त्यांचा भाऊ शिक्षक असून बहिणही शिक्षिका आहे.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख