मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात सर्वाधिक कर्ज नारायण राणेंच्या डोक्यावर - narayan rane in minister with most liabilities in new union cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात सर्वाधिक कर्ज नारायण राणेंच्या डोक्यावर

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार नुकताच झाला. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 78 झाली आहे. 
 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार झाला आहे. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 78 झाली आहे. मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात 1 कोटी रुपयांहून अधिक कर्ज असलेले 16 मंत्री आहेत. यातील महाराष्ट्रातील नारायण राणे पहिल्या क्रमांकावर आहेत, अशी माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालातून समोर आली आहे. 

एडीआर ही निवडणूक हक्क संस्था आहे. निवडणूक लढवताना उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे ही संस्था अहवाल प्रसिद्ध करते. यात उमेदवारांची संपत्ती, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि इतर गोष्टींचा समावेश असतो. मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांचा शपथविधी 7 जुलैला झाला. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 78 वर पोचली आहे. नव्या मंत्रिमंडळात 16 मंत्र्यांवर 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे. 

हेही वाचा : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 

यात नारायण राणे, पीयूष गोयल, कृष्ण हे पहिल्या तीन स्थानी आहेत. नारायण राणे हे सर्वाधिक कर्ज डोक्यावर असलेले मंत्री ठरले आहेत. त्यांच्यावर 30 कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. याचवेळी दोन कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज वादातील आहे. महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर गेलेले पीयूष गोयल हे कर्जाच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्या डोक्यावर 11 कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. कृष्ण पाल हे तिसऱ्या स्थानी असून, त्यांच्यावर 10 कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. 

श्रीमंत मंत्र्यांमध्ये राणे तिसऱ्या क्रमांकावर 
मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात सर्वांत श्रीमंत मंत्री जोतिरादित्य शिंदे असून, महाराष्ट्रातील नारायण राणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. प्रत्येक मंत्र्याची सरासरी संपत्ती 16.24 कोटी रुपये आहे. जोतिरादित्य शिंदे, पीयूष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर या चार मंत्र्यांची संपत्ती 50 कोटी रुपयांहून अधिक आहे. सर्वांत श्रीमंत मंत्री जोतिरादित्य शिंदे आहेत. त्यांची संपत्ती 379 कोटी रुपये आहे. पीयूष गोयल हे दुसऱ्या स्थानी असून, त्यांची संपत्ती 95 कोटी रुपये आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते नारायण राणे हे तिसऱ्या स्थानी असून, त्यांची संपत्ती 87 कोटी रुपये आहे. राजीव चंद्रशेखर चौथ्या स्थानी असून, त्यांची संपत्ती 50 कोटी रुपये आहे, असे अहवालात म्हटले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख