बाप रे...न्यूयॉर्कपेक्षा मुंबईत पेट्रोल दुपटीने महाग! - petrol and diesel prices increased again and reach new high | Politics Marathi News - Sarkarnama

बाप रे...न्यूयॉर्कपेक्षा मुंबईत पेट्रोल दुपटीने महाग!

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जून 2021

कोरोना महामारीमुळे जनता त्रस्त झाली आहे. यातच पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाल्यामुळे त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : कोरोना (Covid19) महामारीमुळे जनता त्रस्त झाली आहे. यातच पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची (Diesel) दरवाढ झाल्यामुळे त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यात आले आहे. मुंबईत (Mumbai) आता पेट्रोलने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. न्यूयॉर्कच्या तुलनेत मुंबईतील  पेट्रोलचा दर दुप्पट आहे. मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलवरील करात मोठी वाढ झाली आहे. 

देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमुळे मागील काही काळ इंधन दरवाढ बंद होती. या निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी लागल्यानंतर 4 मेपासून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ पुन्हा सुरू झाली होती. मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 17 वेळा वाढ झाली होती. या कालावधीत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 4.09 रुपये आणि डिझेलच्या दरात 4.65 रुपये वाढ झाली आहे. 

आता जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी दरवाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात 26 पैसे तर डिझेलच्या दरात 23 पैसै वाढ करण्यात आली आहे. मुंबईत या वर्षी पेट्रोलचा दर 11 टक्के वाढला आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 100.72 रुपये (1.39 डॉलर) आहे. याचवेळी अमेरिकेचे आर्थिक केंद्र असलेल्या न्यूयॉर्कमध्ये हा दर 0.79 डॉलर म्हणजेच जवळपास निम्मा आहे. 

हेही वाचा : कोरोना उपचाराचे दर निश्चित...जाणून घ्या तुमच्या शहरातील दर 

फेब्रुवारीच्या मध्यात काही ठिकाणी पेट्रोलने शंभरी पार केली होती. आता दरवाढ सुरू झाल्याने पेट्रोलने पुन्हा शंभरी गाठली आहे. मुंबईतही पेट्रोलने शंभरचा टप्पा पार केला आहे. राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा दर सर्वाधिक आहे. तेथे पेट्रोलचा दर 105.52 रुपये आणि डिझेलचा दर 98.32 रुपये आहे. 

तेल कंपन्या या मागील 15 दिवसांतील खनिज तेलाचा दर आणि परकी चलन विनिमयाचा दर यांच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलचा रोजचा दर निश्चित करतात. देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. 

मोदी सरकारने भरली झोळी 
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. मोदी सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख