कोरोना रुग्णांवरील उपचाराचे दर निश्चित; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

राज्यातील खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचारासाठी अवास्तव बिल आकारता येणार नाही.
government caps bill amount of covid patients treatment for private hospitals
government caps bill amount of covid patients treatment for private hospitals

मुंबई : कोरोना (Covid-19) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. कोरोना उपचारांसाठी (Treatment)  खासगी रुग्णालयांमध्ये (Private Hospitals) येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी  याबाबतच्या अधिसूचनेला मंजूरी दिली आहे. आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत, यात निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत.

या अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. खाजगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी ८० टक्के खाटांसाठी सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार व उर्वरित २० टक्के खाटांसाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार दर आकारणीची अधिसूचना काल संपली. आज त्यास मुदतवाढ देताना त्यात शहरांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा करण्यात आली आहे.

याविषयी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, दर कमी करण्याबाबत अनेक निवेदने माझ्याकडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्याशी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने या दरांमध्ये गाव, शहरांचे वर्गीकरण करून बदल करण्याचे ठरले व तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला. 

यापूर्वीच्या अधिसुचनेत उपचारांचे दर हे मोठ्या शहरातील रुग्णालये व अतिदुर्गम भागातील रुग्णालये यासाठी एकच होते. शहरांच्या वर्गीकरणामुळे आता उपचारांच्या खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे. विमा कंपन्या आणि विविध प्रकारच्या भत्ते देताना ज्याप्रमाणे शहरांचे वर्गीकरण केले जाते. त्याच निकषावर वर्गीकरण आणि संबंधित उपचारांचे दर निश्चित केल्याने ग्रामीण भागातील रुग्णांवरील उपचारांचा खर्च तुलनेने कमी होणार आहेच.

दरांसाठी  शहरांच्या दर्जानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. अ, ब, क अशा गटात शहरे व भागांची विभागणी केली आहे  त्यामुळे आता शहरी व ग्रामीण भाग यामध्ये उपचारांचा दर वेगवेगळा असेल व पर्यायाने ग्रामीण भागात तुलनेने कमी खर्चात उपचार शक्य होतील. रुग्णाला संबंधित रुग्णालयाने पुर्वलेखापरिक्षीत देयक देणे बंधनकारक आहे. जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर भरारी पथकांमार्फत तपासणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूदही या अधिसूचनेत कायम ठेवण्यात आली आहे, अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली

कोरोना रुग्णांकडून जास्तीत जास्त किती दर आकारले जाऊ शकतात? 

वॉर्डमधील नियमित विलगीकरण ( प्रतिदिवस)

अ वर्ग शहरांसाठी ४००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३००० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २४०० रुपये . यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च  व जेवण याचा समावेश. कोविड चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.

व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण :

अ वर्ग शहरांसाठी ९००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ६७०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ५४०० रुपये

केवळ आयसीयू व विलगीकरण :

अ वर्ग शहरांसाठी ७५०० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ५५०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ४५०० रुपये

अ वर्ग शहरे : मुंबई तसेच महानगर क्षेत्र ( भिवंडी , वसई-विरार वगळून),  पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर ( नागपूर मनपा, दिगडोह, वाडी).

ब वर्ग शहरे : नाशिक, औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली तसेच, सर्व जिल्हा मुख्यालये 

क वर्ग शहरे : अ आणि ब वर्गाव्यतिरिक्त इतर शहरे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com