सर्व समर्थकांचे राजीनामे नामंजूर करीत पंकजा मुंडे गरजल्या... - pankaja munde says she will not accept resignation of party workers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

सर्व समर्थकांचे राजीनामे नामंजूर करीत पंकजा मुंडे गरजल्या...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जुलै 2021

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचे राजीनामासत्र सुरू आहे. यामुळे भाजमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

मुंबई : खासदार प्रीतम मुंडे (Preetam Munde) यांना मंत्रिपद न मिळाल्यावरुन भाजपमध्ये गदारोळ सुरू आहे. यामुळे भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांचा समर्थकांचे राजीनामासत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीहून परतल्यानंतर पंकजा मुंडेंनी आज पहिल्यांदाच समर्थकांशी संवाद साधला. सर्व समर्थकांचे राजीनामे नामंजूर करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

पंकजा मुंडे यांनी दिल्लीहून परतल्यानंतर आज कार्यकर्त्यांशी मुंबईत संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मी लालची नाही, मला सत्तेची कोणतीही लालसा नाही. मी असुरक्षित नाही. कुणालाही संपवून मला राजकारण करायचे नाही. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करत आहे. मला दबाव तंत्र करायचे असेल तर ही ती जागा नाही. ही जागा पुरणार नाही आणि त्यासाठी वेगळी जागा लागेल.

मी काल दिल्लीत गेले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा झाली आहे. तुम्ही कार्यकर्त्यांना समजवाल हे त्यांनी मला सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला झापल्याच्या बातम्या आल्या. मी फटकार खाऊन तुमच्यापुढे आली असते असं वाटतं का? गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मला केंद्रात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. तेव्हा मी मंत्रिपद नाकारले होतं. आता ते पद मी मागेन का?

भगिनी प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात न घेतल्याने नाराज असल्याचे सांगितले जाणाऱ्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. माजी मंत्री विनोद तावडे आणि महिला आघाडीच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यासह इतरही राष्ट्रीय सचिव त्यांच्यासोबत होते. पंतप्रधानांनी पंकजा मुंडे यांना स्वतंत्ररीत्या भेट दिली नसून राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीत सहभागी झालेल्या सर्वांनाच पंतप्रधान यांनी आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले होते, असे पक्ष सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा : मोदींच्या सरकारमध्ये स्मृती इराणी, यादव, सोनोवालांचं वाढलं वजन 

पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप संघटनेची नवीन टिम तयार झाली आहे. यातील सरचिटणीस आणि उपाध्यक्ष पदावरील नेत्यांशी पंतप्रधानांची चर्चा झाली होती. राष्ट्रीय सचिवांशी चर्चा राहिली होती. कोरोना आणि मंत्रीमंडळ विस्तारामुळे या बैठका लांबल्या होत्या. या बैठकांचे नियोजन आधीच झालेले होते. त्यानुसार तेरा राष्ट्रीय सचिवांना आज पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित करण्यात आले होते. 

केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. त्यात महाराष्ट्रातून डॉ. भागवत कराड आणि डॉ. भारती पवार या नवोदितांना मोदी यांनी संधी दिली. संभाव्य नावांमध्ये पंकजा यांच्या भगिनी आणि खासदार प्रीतम मुंडे यांचेही नाव होते. त्यांचा समावेश मंत्रिमंडळात न झाल्याने मुंडे भगिनी नाराज आहेत असे सांगितले जाते. पंकजा मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ‘आम्ही नाराज नाही, कार्यकर्ते नाराज आहेत’ असे सांगितले होते. त्यानंतर बीडमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख