मोदी सरकारमध्ये स्मृती इराणी, भूपेंद्र यादव अन् सोनोवालांचं वाढलं वजन - smriti irani bhupender yadav and sarbanand sonowal appointed in key cabinet committee | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी सरकारमध्ये स्मृती इराणी, भूपेंद्र यादव अन् सोनोवालांचं वाढलं वजन

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये स्मृती इराणी, भूपेंदर यादव आणि सर्वांनंद सोनोवाल यांचे वजन वाढल्याचे समोर आले आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) विस्तार नुकताच झाला. या विस्तारात 43 मंत्र्यांचा शपथविधी होऊन एकूण मंत्र्यांची संख्या 78 वर पोचली आहे. आता नव्या मंत्रिमंडळात स्मृती इराणी (Smriti Irani),  भूपेंदर यादव (Bhupender Yadav) आणि सर्वांनंद सोनोवाल (Sarbananda Sonowal) यांचे वजन वाढल्याचे समोर आले आहे. मोदींनी त्यांनी सरकारमध्ये महत्वाचे स्थान दिले आहे. 

मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत 43 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार होता. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल हे पक्ष सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या होत्या. मोदींकडून मंत्रिमंडळ फेररचना आणि विस्तारानंतर मंत्रिगटांची पुनर्रचना करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी या मंत्रिगटांच्या अध्यक्षांसह सदस्यांची निवड केली आहे. 

अतिशय महत्वाच्या राजकीय कामकाजविषयक मंत्रिगटात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भूपेंदर यादव आणि सर्वानंद सोनोवाल यांना स्थान दिले आहे. या समितीचे अध्यक्षपद खुद्द पंतप्रधानांकडेच आहे. स्मृती इराणी यांच्याकडे आधी वस्त्रोद्योग खाते देऊन त्यांना अडगळीत टाकण्यात आले होते. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याकडे महत्वाचे असे महिला व बाल कल्याण खाते देण्यात आले. आता त्यांचा राजकीय कामकाजविषयक मंत्रिगटात समावेश झाल्याने इराणींचे सरकारमधील वजन पुन्हा एकदा वाढल्याचे मानले जात आहे. 

आसाममध्ये भाजपला दुसऱ्यांदा विजय मिळवून देण्याचे काम सर्वानंद सोनोवाल यांनी केले होते. याचबरोबर आपला मुख्यमंत्रिपदावरील दावाही त्यांनी सोडून दिला होता. त्यामुळे त्यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले होते. याचबरोबर बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव यांचे मागील काही काळापासून पक्ष संघटनेतील स्थान वाढत आहे. त्यांना कामगार मंत्रालय देण्यात आले आहे. आता दोघांचाही राजकीय कामकाजविषयक मंत्रिगटात समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही नेत्यांचा समावेश राजकीय कामकाजविषयक मंत्रिगटात झाल्याने आगामी काळात त्यांचाच सरकारमध्ये वरचष्मा राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : पंतप्रधान मोदींना राणेंवर टाकली आणखी एक मोठी जबाबदारी 

याचबरोबर संसदीय कामकाजविषयक मंत्रिगटात विरेंद्र कुमार, किरण रिजिजू आणि अनुरागसिंह ठाकूर यांच्या समावेश आहे. या मंत्रिगटाचे अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथसिंह आहेत. रोजगार आणि कौशल्य विकास या मंत्रिगटाचे अध्यक्षपद मोदींकडे असून, यात अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, रामचंद्रप्रसाद सिंह आणि जी.किशन रेड्डी यांना स्थान देण्यात आले आहे. 

सर्व मंत्रिगटांची फेररचना झाली असली तरी संरक्षणविषयक मंत्रिगट तसाच ठेवण्यात आला आहे. या मंत्रिगटात पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्तीत समितीत मोदी आणि शहा हेच कायम आहेत. सरकारमधील सहसचिव पदाच्या वरील सर्व नियुक्त्यांचे अधिकार या समितीकडे आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख