1930 पासून मुस्लिमांची संख्या सुनियोजितपणे वाढवली; मोहन भागवतांचं मोठं विधान - Organised attempts to increase the Muslim population since 1930 says Mohan Bhagwat | Politics Marathi News - Sarkarnama

1930 पासून मुस्लिमांची संख्या सुनियोजितपणे वाढवली; मोहन भागवतांचं मोठं विधान

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जुलै 2021

सीएए व एनआरसीला हिंदू-मुस्लिम विभाजनाचा रंग चढवून सांगणं हे राजकीय षडयंत्र आहे, असं भागवत म्हणाले. 

गुवाहाटी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी आसाममध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. आज त्यांनी मुस्लिम आणि पाकिस्तानच्या फाळणीवर भाष्य केलं आहे. भारतात 1930 पासून सुनियोजितपणे मुस्लिमांची संख्या वाढवण्यात आली. प्रामुख्याने पश्चिम बंगाल, आसाम आणि पंजाब हे झाले. ही योजना काही प्रमाणात यशस्वी झाल्याने फाळणी होत पाकिस्तानची निर्मिती झाली, असंही भागवत म्हणाले आहेत. (Organised attempts to increase the Muslim population since 1930 says Mohan Bhagwat)

गुवाहाटी येथे भागवत यांच्या हस्ते एनआरसी-सीएए (NRC-CAA) वर लिहिण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा उपस्थित होते. यावेळी भागवत यांनी सीएए व एनआरसी बाबत मुस्लिमांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, सीएए व एनआरसीला हिंदू-मुस्लिम विभाजनाचा रंग चढवून सांगणं हे राजकीय षडयंत्र आहे. केवळ राजकीय फायदा उठवण्यासाठी हे केले जात असल्याचे भागवत म्हणाले. 

हेही वाचा : आदित्य ठाकरे अन् राज कुंद्रा यांना एकत्र जेवायला जायचे होते!

सीएएमुळं एकाही भारतीय मुस्लिमाचे नुकसान होणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन्ही देशांनी आपआपल्या देशातील अल्पसंख्याकांची काळजी घेतली जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसारच भारतात मुस्लिमांची काळजी घेतली जात आहे. पण पाकिस्तान त्याबाबतीत अपयशी ठरलं आहे. भारताने नेहमीच बाहेरच्यांचे स्वागत केलं आहे. पण काहींचा हेतू त्यांची भाषा, धर्म आणि खाण्याच्या सवयी इतरांवर लादण्याचा असल्याने ते काळजीचे आहे, असं भागवत यांनी नमूद केलं. 

1930 देशात मुस्लिमांची संख्या वाढविण्याचे सुनियोजित प्रयत्न सुरू झाले. त्याचा दहशतवाद किंवा अर्थव्यवस्थेशी संबंध नव्हता. पण देशात समाजाला प्रबळ शक्ती बनवायचे होते. पंजाब, बंगाल आणि आसाममध्ये हे झाले. त्यानंतर फाळणी झाली. यामध्ये बंगाल आणि पंजाबचेही विभाजन झाले तर आसाम वाचले, असे भागवत यांनी सांगितले. 

जगाने आम्हाला धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाहीचे धडे देऊ नयेत. इतरांचा धर्म, संस्कृती आणि भाषेचा आदर करणं ही भारताची संस्कृती आहे. संविधानामध्ये हक्क आणि कर्तव्यांबाबत स्पष्टपणे सांगितले आहे. पण काही जणांना केवळ सर्व हक्क हवे आहेत, त्यांना कर्तव्याचे पालन करायचे नाही, हीच खरी समस्या आहे, यावरही भागवत यांनी जोर दिला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख