आदित्य ठाकरे अन् राज कुंद्रा यांना एकत्र जेवायला जायचे होते! - Aditya Thackeray and Raj Kundras tweets are viral on social Media-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

आदित्य ठाकरे अन् राज कुंद्रा यांना एकत्र जेवायला जायचे होते!

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जुलै 2021

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व कुंद्रामध्ये ट्विटवर 2014 मध्ये झालेले संभाषण सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. त्यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे. (Aditya Thackeray and Raj Kundras tweets are viral on social Media)

राज कुंद्रा याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या  गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली. पॉर्नोग्राफी प्रकरणात तो मुख्य सूत्रधार आहे.

हेही वाचा : आता देशातील प्रत्येक राज्यात 'खेला होबे'; ममतांची गर्जना

आदित्य ठाकरे व कुंद्रा यांच्यात 2014 व 2015 मध्ये ट्विटरवर झालेली संभाषण व्हायरल होत आहेत. 2014 मध्ये राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी यांनी सतयुग गोल्ड नावाने ज्वेलरी शॉप सुरू केली होती. त्यावर 5 एप्रिल रोजी ठाकरे यांनी कुंद्राला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या होत्या. या शुभेच्छा स्वीकारात कुंद्रा याने 'मला तुझी खूप आठवण आली,' असं म्हटलं आहे. 18 जुलै 2014 रोजीही ठाकरे यांनी सतयुग गोल्डने सुरू केलेल्या एका योजनेवरून कुंद्रा व शिल्पाचे अभिनंदन केले आहे.

24 नोव्हेंबर 2015 रोजी राज कुंद्रा याने ट्विट करून आदित्य ठाकरे व दिनो मोरिया यांच्यासोबत खूप दिवसांनी जेवण केल्याचा उल्लेक केला आहे. तसेच पुढील वेळी जेवणासाठी एवढ्या दिवसांचा कालावधी नको, असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यावर ठाकरे यांनीही 'नक्कीच! खूप मजा आली, लवकरच भेटू' असे म्हणत त्याला होकारही दिला आहे.  

29 मार्च 2014 च्या एका ट्विटमध्ये ठाकरे आणि बंटी वालिया यांना उद्देशून त्यांना मदत केल्याबाबत आनंद असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे व राज कुंद्रा हे अनेक वर्षांपासून एकमेकांना चांगल्यारीतीने ओळखत असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही ठाकरे व कुंद्रा यांच्यातील संभाषण ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी ठाकरे यांना टोला लगावला आहे. 'भारताच्या प्रिन्सला बँकॉक आवडतं, तर महाराष्ट्राच्या प्रिन्सला राज कुंद्रा आवडतो,' असं अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, कुंद्रा याच्यानंतर नेरुळमधून रायन थार्प याला अटक करण्यात आली आहे. कुंद्राने एका कंपनीच्या माध्यमातून 30 ते 40 अॅप्सची निर्मिती केलेली आहे. या कंपन्यांवर काही दिवस तो स्वतः संचालक राहायचा आणि नंतर राजीनामा देऊन विश्वासातील व्यक्तीला तिथे नेमायचा.  त्याने ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या शेकडो अश्लील व्हिडिओंचा डेटा मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणात आणखी 2 मॉडेल गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली मढ बेटावरील खासगी बंगल्यांमध्ये वेश्याव्यवसाय आणि पॉर्न व्हिडीओचे शूटिंग होत असल्याची माहिती पोलिसांना फेब्रुवारीमध्ये मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यावेळी या बंगल्यांवर छापे टाकले होते. तरुण मुलींना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून काही टोळ्या अश्लील व्हिडीओमध्ये काम करायला लावत होत्या. या छाप्यादरम्यान पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली होती. 

त्यावेळी छाप्यात पोलिसांनी उमेश कामत, यास्मीन बेग खान, प्रतिभा नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर आणि मोहम्मद आसिफ यांना अटक केली होती. त्यात पुढे गहना वशिष्ठ आणि सागरिका शोना सुमन यांनाही अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर या संपूर्ण गुन्ह्यामागे मुख्य आरोपी उद्योगपती राज कुंद्रा असल्याचे समोर आले होते.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख