खूषखबर : कोरोना लशीसाठी आधी नोंदणीची गरज नाही; आता थेट जाऊन घ्या लस - now anybody can get covid vaccine at vaccine center without registration | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

खूषखबर : कोरोना लशीसाठी आधी नोंदणीची गरज नाही; आता थेट जाऊन घ्या लस

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जून 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. 

नवी दिल्ली : देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने लसीकरणावर (Covid Vaccination) भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता 18 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरणासाठी  आधी नोंदणी करण्याची आवश्यकता असणार नाही. ते थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतील. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता 18 वर्षांवरील व्यक्तींना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोना लस घेता येईल. यासाठी त्यांना को-विन पोर्टलवर आधी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. ते लसीकरण केंद्रावर जाऊन को-विन पोर्टलवर नोंदणी करतील आणि तेथेच लस घेतील. 

याआधी कोरोना लस घेण्याआधी नोंदणी करणे बंधनकारक होते. को-विन पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर मिळालेल्या ठराविक वेळी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी लागत होती. आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारने हे नोंदणीचे बंधन काढून टाकले आहे. अनेक ठिकाणी नोंदणी करण्यात अडचणी येत असल्याने लसीकरणाचा वेग कमी असल्याचे समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा : भारत बायोटेक म्हणतेय, सरकारला दीडशे रुपयात लस देणे परवडणारे नाही

सध्या देशभरात कोविशिल्डसह कोव्हॅक्सिनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ठराविक अंतरात डोस देणे गरजेचे असल्याने बहुतेक राज्यांनी दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जात आहे. तर काही राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण थांबवले आहे. अनेक कंपन्यांनी थेट राज्यांना लस पुरवठा करण्यास नकार दिला आहे. अनेक राज्यांनी ग्लोबल टेंडर काढूनही त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. 

जगातील सर्वांत मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील सर्व रुग्णांना लस देण्यास सुरवात झाली. आता चौथ्या टप्प्यात 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. 

देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख