भारत बायोटेक म्हणतेय, सरकारला दीडशे रुपयांत लस देणे परवडणार नाही! - Bharat Biotech says 150 rupees per dose is not sustainable in long run | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

भारत बायोटेक म्हणतेय, सरकारला दीडशे रुपयांत लस देणे परवडणार नाही!

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जून 2021

भारत बायोटेकच्या कोरोनावरील कोव्हॅक्सिन लशीचा वापर देशात होत आहे. ही लस केंद्र सरकारला 150 रुपयांना मिळते. 

नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोरोनावरील कोव्हॅक्सिन (Covaxin) लशीचा वापर देशात होत आहे. ही लस केंद्र सरकारला (Central Government) 150 रुपयांना मिळते. यापुढे दीडशे रुपयांत सरकारला लस पुरवणे शक्य नसल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. दीर्घकाळ स्वस्तात लस देणे कंपनीला परवडणारे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

भारत बायोटेकने म्हटले आहे की, भारत सरकारला आम्ही कोव्हॅक्सिनच्या एका डोससाठी 150 रुपये आकारत आहोत. ही किंमत स्पर्धात्मक नसून, दीर्घकाळ परवडण्यासारखी नाही. यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी आम्हाला खासगी बाजारपेठेत जास्त किंमत ठेवण्यास सरकारने परवानगी द्यावी. कंपनीने केवळ 10 टक्के लस खासगी रुग्णालयांना पुरवली आहे. याचवेळी उरलेली सर्व लस केंद्र व राज्य सरकारांना दिली आहे. 

केंद्र सरकारने दिलेल्या नवीन निर्देशानुसार कंपनीला 75 टक्के लस केंद्र सरकारला पुरवावी लागले. उरलेली 25 टक्के लस खासगी रुग्णालयांना पुरवता येईल. यातून कंपनीला खर्च भरून काढता येणार नाही. यामुळे सरकारने लशीची किंमत वाढवण्यास कंपनीला परवानगी द्यावी. याचबरोबर खासगी आणि सरकारी रुग्णालयांना वेगवेगळी किंमत ठरवण्याची मुभा कंपनीला द्यावी, असे कंपनीने म्हटले आहे. 

केंद्र सरकार नागरिकांना मोफत कोरोना लस देत आहे. याचवेळी खासगी रुग्णालयात नागरिक सशुल्क लस घेऊ शकतात. नागरिकांना मोफत लशीचा पर्याय असताना ते खासगी रुग्णालयात लस घेण्यासाठी येण्याची शक्यता कमी आहे. यामुळे खासगी रुग्णालयांकडून लशीची मागणी जास्त असण्याची शक्यताही कमी आहे, असे भारत बायोटेकने स्पष्ट केले आहे.  

हेही वाचा : सिरमच्या नवीन कोरोना लशीने कोव्हिशिल्ड अन् कोव्हॅक्सिनला मागे टाकले 

दरम्यान, याआधी बोलताना भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एम. एल्ला म्हणाले होते की, कोरोनावरील नाकातून देण्यात येणाऱ्या लशीवर आम्ही संशोधन करीत आहोत. यासाठी आम्हाला खर्च भरून काढणे आवश्यक आहे. मागील २५ वर्षांपासून आमचे ध्येय हेच राहिले आहे की जनतेला परवडण्याजोग्या दरात जागतिक दर्जाची आरोग्य व्यवस्था उपलब्ध करुन देणे. या लशीची निर्मिती खर्चिक आहे. उत्पादन खर्च, उत्पादन केंद्र आणि वैद्यकीय चाचण्या यांचा खर्च धरून लशीची किंमत निश्चित करण्यात आली आहे. 

सध्या देशात तीन कोरोना लशींचा वापर होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. याचबरोबर रशियाची स्पुटनिक व्ही लसही देशात उपलब्ध आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख