एका पटेलांमुळे दुसऱ्या पटेलांची खुर्ची जाणार?

भाजप नेते नितीन पटेल यांना मंत्रिमंडळातून वगळले जाईल, अशी शक्यता असून, त्यांच्यावर कोणती जबाबदारी द्यायची, असा प्रश्न भाजपसमोर उपस्थित होत आहे.
एका पटेलांमुळे दुसऱ्या पटेलांची खुर्ची जाणार?
nitin patel may not be inducted in new gujarat cabinet

गांधीनगर : विजय रूपानी (Vjay Rupani) यांनी गुजरातच्या (Gujarat) मुख्यमंत्रिपदाचा (Chief Minister) राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हे आले आहेत. भूपेंद्र पटेल आणि आधीचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल (Nitin Patel) हे दोघेही पाटीदार समाजातील आहेत. यामुळे नितीन पटेल यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. 

नवीन मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार आहे. त्याआधीच भाजपमध्ये वाद उफाळला आहे.  मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सर्व मंत्रिमंडळात बदल हवा आहे. यामुळे अंतर्गत नाराजी वाढली आहे. सुमारे 90 टक्के मंत्र्यांना बदलले जाईल, अशी चर्चा आहे. केवळ एक ते दोन मंत्री नवीन मंत्रिमंडळात कायम राहतील, असे मानले जात आहे. यामुळे आधीच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री बनल्याने नितीन पटेल यांची खुर्ची धोक्यात आली आहे. हे दोन्ही नेते पाटीदार समाजाचे आहेत. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. यामुळे जातीय समीकरणावर भाजपकडून बारकाईने लक्ष दिले जात आहे. यामुळे एकाच समाजातील नेत्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपद दिले जाणार नाही. यामुळे नितीन पटेल यांना मंत्रिमंडळातून वगळले जाईल. परंतु, त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मोठा प्रश्न भाजपसमोर आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

मंत्रिमंडळातून नितीन पटेल, भूपेंद्रसिंह चुडासामा, आर.सी.फाल्दू आणि कौशिक पटेल यांच्यासाख्या बड्या नेत्यांना डच्चू दिला जाईल, अशी शक्यता आहे. नितीन पटेल हे आधी उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे अर्थमंत्रिपद होते. भूपेंद्र चुडासामा हे शिक्षणमंत्री, आर.सी.फाल्दू कृषिमंत्री तर कौशिक पटेल महसूल मंत्री होते. हे चौघेही भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. या सर्वांच्या पुनर्वसनाचा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर आहे. 

भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात 21 ते 22 मंत्री असतील. आज त्यांचा शपथविधी होणार होता. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल आणि महिलांची संख्या वाढवली जाईल, अशी शक्यता आहे. यामुळे अनेक बड्या नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळेल. जातीय समीकरणांचा समतोल राखतानाच स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना मंत्रिमंडळात विशेषकरून स्थान मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.  

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पायउतार होणे अनपेक्षित होते. असे असताना रूपानी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे जाऊन राजीनामा सोपवला होता. यानंतर भाजपच्या आमदारांची बैठक होऊन त्यात भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in