भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर; नाराज नेते माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी दाखल

मुख्यमंत्री बदलले तरी पक्षांतर्गत नाराजी कायम असून, मंत्रिमंडळावरून आता वाद सुरू झाला आहे. विजय रूपानींच्या घरी नाराज नेते दाखल झाले आहेत.
भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर; नाराज नेते माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी दाखल
bjp leaders reach former chief minister vijay rupani house

गांधीनगर : विजय रूपानी (Vjay Rupani) यांनी गुजरातच्या (Gujarat) मुख्यमंत्रिपदाचा (Chief Minister) राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हे आले आहेत. मुख्यमंत्री बदलले तरी पक्षांतर्गत नाराजी कायम असून, मंत्रिमंडळावरून आता वाद सुरू झाला आहे. पक्षाचे नाराज नेते रूपानी यांच्या घरी दाखल झाले आहेत. 

नवीन मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार आहे. त्याआधीच भाजपमध्ये वाद उफाळला आहे.  मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सर्व मंत्रिमंडळात बदल हवा आहे. यामुळे अंतर्गत नाराजी वाढली आहे. सुमारे 90 टक्के मंत्र्यांना बदलले जाईल, अशी चर्चा आहे. केवळ एक ते दोन मंत्री नवीन मंत्रिमंडळात कायम राहतील, असे मानले जात आहे. यामुळे आधीच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. अनेक नाराज नेते माजी मुख्यमंत्री रूपानी यांच्या घरी दाखल झाले आहेत. 

ईश्वर पटेल, ईश्वर परमार, बचु खाचड, वासण आहीर, योगेश पटेल आदी नेते रूपानी यांच्या घरी दाखल झाले आहेत. रूपानी यांच्या घरी नाराज नेत्यांची बैठक सुरू आहे. मंत्रिमंडळात  समावेश नसल्याने हे नाराज रूपानींकडे पोचले आहेत. यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यातील अनेक नेते हे बंडाच्या पवित्र्यात आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पायउतार होणे अनपेक्षित होते. असे असताना रूपानी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे जाऊन राजीनामा सोपवला होता. यानंतर भाजपच्या आमदारांची बैठक होऊन त्यात भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 

गुजरात हे भाजपसाठी अतिशय महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेही गुजरातमधील आहे. या राज्यात पराभव होणे भाजपला परवडणारे नाही. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असताना रूपानी हे सक्षम मुख्यमंत्री असल्याचे चित्र जनतेत नव्हते. याचबरोबर रूपानी हे जैन समाजाचे आहेत. आगामी निवडणुकीआधी पटेल-पाटीदार समाजाच्या नेत्याला संधी देऊन या समाजाला खूष करण्याची खेळी भाजपने खेळली आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

याआधी भाजपशासित काही राज्यांमध्येही कार्यकाळ पूर्ण होण्याआधी मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. यात कर्नाटक, उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून बी.एस.येडियुरप्पा यांना तर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदावरुन तिरथसिंह रावत यांना पायउतार व्हावे लागले होते. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in