मोदींच्या मंत्रिमंडळाचा 'मेगाविस्तार'; 28 जणांचा होणार समावेश - narendra modi union cabinet expansion soon says sources | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींच्या मंत्रिमंडळाचा 'मेगाविस्तार'; 28 जणांचा होणार समावेश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार होणार आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार होणार आहे. यात पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून  नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल. मोदींकडून सुमारे 28 जणांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यात जोतिरादित्य शिंदे, सुशीलकुमार मोदी, सर्वानंद सोनोवाल यांच्यासह महाराष्ट्रातून नारायण राणे (Narayan Rane) आणि  प्रितम मुंडे (Pritam Munde) यांच्या नावाची चर्चा आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात परंतु, सध्या ही संख्या 53 आहे. यामुळे 28 नवीन सदस्यांचा समावेश होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी काही दिवसांपूर्वी चर्चा केली होती. त्यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना गटाने बोलावून त्यांच्याशी चर्चाही केली होती. मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले मध्य प्रदेशातील नेते जोतिरादित्य शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. सर्वांनंद सोनोवाल यांनी आसाममध्ये भाजपला दुसऱ्यांदा विजय मिळवून देत हिमंत बिस्वा सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला होता. त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात आहे. 

याचबरोबर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल. भाजपने त्यांना राज्यातून हलवून केंद्रात नेल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. याचबरोबर राजस्थान आणि  बिहारचे भाजप प्रभारी भूपेंदर यादव, मध्य प्रदेशातील नेते व पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय आणि पक्षाचे प्रवक्ते जफर इस्लाम यांचाही समावेश मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : घाबरू नका, कोरोनाची तिसरी लाट येणार नाही! 

महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचेही नाव आघाडीवर आहे. मराठा आरक्षण प्रश्नामुळे राणेंसारख्या मराठा चेहऱ्याला संधी दिली जाईल, असे मानले जात आहे. याचबरोबर बीडच्या भाजप खासदार प्रितम मुंडे यांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रितम यांना स्थान दिले जाण्याची शक्यता अधिक आहे. 

पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या आहेत. राज्यातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट, तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री असे सहा मंत्री  आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, पण राज्यातील सत्तांतराच्या धक्कादायक नाट्यानंतर सावंत यांना पक्षाच्या आदेशनांतर  मंत्रिपद सोडावे लागले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख