घाबरू नका, कोरोनाची तिसरी लाट येणार नाही! 'एम्स'च्या प्रमुखांचा अंदाज - aiims chief randeep guleria says covid third wave will not hit india | Politics Marathi News - Sarkarnama

घाबरू नका, कोरोनाची तिसरी लाट येणार नाही! 'एम्स'च्या प्रमुखांचा अंदाज

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जुलै 2021

देशातील अनेक राज्यांत आता निर्बंध शिथिल होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत (Second Wave) आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) येणार  नाही, असा अंदाज दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) प्रमुख डॉ.रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी वर्तवला आहे. 

देशातील अनेक राज्यांत आता निर्बंध शिथिल होऊ लागले आहेत. यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावर डॉ.रणदीप गुलेरिया म्हणाले की, देशातील जनतेने खबरदारी घेतली आणि जास्त लोकसंख्येचे लसीकरण झाल्यास कोरोनाची तिसरी लाट येऊ शकणार नाही. तिसरी लाट आलीच तरी ती कमजोर असेल. 

दोन वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस एकाच व्यक्तीला देण्याबाबत डॉ. गुलेरिया म्हणाले की, दोन वेगवेगळ्या लशींचे डोस देण्याबाबत आणखी संशोधनाची आवश्यकता आहे. सध्या समोर आलेल्या निष्कर्षानुसार दोन वेगवेगळ्या लशींचे डोस देणे परिमाणकारक दिसत आहे. परंतु, यामुळे दुष्परिणामही दिसून येऊ शकतात. यासाठी आणखी डेटा उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. 

देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येबाबत डॉ.गुलेरिया म्हणाले की, पॉझिटिव्हीटी दर जास्त असेल अशा ठिकाणी कठोर उपाययोजना आवश्यक आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी काही ठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे. तेथे तातडीने उपाययोजना करुन ती ठिकाणे हॉटस्पॉट बनू नयेत याची काळजी घ्यावी. अन्यथा संसर्ग दुसरीकडे पसरू शकतो. 

हेही वाचा : हाय कमांडने गेहलोत गटाच्या नाड्या आवळल्याने पायलट गट जोशात

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील घट सुरूच आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 48 हजार 786 रुग्ण सापडले असून, 1 हजार 5 जणांचा मृत्यू झाला आहे. याचवेळी कोरोनातून बरे झालेले 61 हजार 588 रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडले आहेत. याचबरोबर सक्रिय रुग्णसंख्येतही घट झाली असून, देशात एकूण 5 लाख 23 हजार सक्रिय रुग्ण आहेत. 

तिसरी लाट 6 ते 8 आठवड्यांत? 
काही दिवसांपूर्वी डॉ. गुलेरिया म्हणाले होते की, देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणे अपरिहार्य आहे. ही लाट पुढील 6 ते 8 आठवड्यांत येण्याची शक्यता आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त लोकंसख्येचे कोरोना लसीकरण करणे अतिशय गरजेचे आहे. लोक कोरोनाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करु लागले आहेत. मागील दोन लाटांकडे बघून आपण शिकलो नाही असेच आता म्हणावे लागत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख