पंतप्रधान मोदींची 'व्हॅक्सिन डिप्लोमसी'; बांगलादेशला मोठे गिफ्ट - narendra modi gifts 12 lakhs doses of covid vaccine to bangladesh | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान मोदींची 'व्हॅक्सिन डिप्लोमसी'; बांगलादेशला मोठे गिफ्ट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 मार्च 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर असून, कोरोनाचा प्रादुर्भाव देशात सुरु झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. 

नवी दिल्ली : बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे गिफ्ट दिले आहे. मोदींनी बांगलादेशला कोरोना लशीचे 12 लाख डोस भेट म्हणून दिले आहेत. मोदी हे दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर असून, त्यांच्यासोबत ते हे डोस घेऊन गेले आहेत. याआधी मोदी सरकारने बांगलादेशला 20 लाख कोरोना लशींचे डोस भेट म्हणून दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात सुरु झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. 

मोदींचे बांगलादेशातील ढाक्यात आगमन झाल्याबरोबरच त्यांच्यासोबत 12 लाख कोरोना लशीचे डोस दाखल झाले. एअर इंडियाच्या विशेष विमानाने शंभर बॉक्समध्ये हे लशीचे डोस पाठवण्यात आले. याआधी भारताने बांगलादेशला 20 लाख कोरोना लशींची भेट दिली होती. हे डोस कोव्हिशिल्ड या लशीचे आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात सुरु झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यदिनाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा आणि बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रहमान यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात मोदी सहभागी होणार आहेत. 

हेही वाचा : कोरोनाचा उद्रेक झाल्याने सरकारकडून कोरोना लशीच्या निर्यातीवर निर्बंध 

दरम्यान, भारतात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून, आरोग्य यंत्रणांची धास्ती वाढली आहे. देशात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली जात आहे. आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख