कोरोनाच्या उद्रेकानंतर मोदी सरकार झाले जागे; लशीच्या निर्यातीवर अखेर घातले निर्बंध

देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून, लसीकरणाचा वेग वाढवण्याचा दिशेने पावले उचलली आहेत.
India will not export covid vaccines for next few months
India will not export covid vaccines for next few months

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून, आरोग्य यंत्रणांची धास्ती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कोरोना लशीच्या निर्यातीवर निर्बंध आणण्यासाठी पावले उचलली आहेत. आता भारतातून जगभरातील 80 देशांना लशीचे 6.04 कोटी डोस निर्यात केले आहेत. सरकारच्या या पावलामुळे देशातील लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे देशात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. यासाठी देशांतर्गत लशीची मागणी वाढणार आहे. त्यामुळे लशीच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध पुढील काही महिने राहतील. यात झालेले व्यावयासिक व निर्यात करार वगळण्यात येतील. भारताने आतापर्यंत जगभरातील 80 देशांना लशीचे 6.04 कोटी डोस पुरवले आहेत. 

आता आधीचे व्यावसायिक आणि वाणिज्य करार वगळून लशीची निर्यात होणार नाही. एखाद्या देशाने मागणी केल्यास आपली मागणी पाहून यावर विचार केला जाणार आहे. हे निर्बंध पुढील 2 ते 3 महिने कायम राहणार आहेत. त्यानंतर या निर्बंधांचा पुनर्विचार केला जाईल. याचबरोबर देशांतर्गत लशीचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली जात आहे. आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com