महाराष्ट्राला 5 मंत्रिपदे? राणेंसह राज्यातील पाच नेते मोदींच्या निवासस्थानी दाखल - narayan rane and five other leaders meet narendra modi | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्राला 5 मंत्रिपदे? राणेंसह राज्यातील पाच नेते मोदींच्या निवासस्थानी दाखल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार आज होणार आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. मोदींकडून सुमारे 28 जणांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते नारायण राणे, कपिल पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, भागवत कराड, हिना गावित हे मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे. 

महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचेही नाव आघाडीवर आहे. मराठा आरक्षण प्रश्नामुळे राणेंसारख्या मराठा चेहऱ्याला संधी दिली जाईल, असे मानले जात आहे. याचबरोबर पालघरमधील भाजप नेते  कपिल पाटील यांचाही समावेश होईल, असे दिसत आहे. मराठवाड्यातील वंजारी नेते भागवत कराड हेसुद्धा दिल्लीत दाखल झाले आहेत. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे याचे ते निकटवर्ती मानले जात. नंदूरबारच्या खासदार डॉ.हिना गावित आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचाही समावेश होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. 

महाराष्ट्रातील हे सर्व नेते पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात नवीन मंत्री शपथ घेणार आहेत.  राज्यातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट, तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री असे सहा मंत्री  आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, पण महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर सावंत यांना पक्षाच्या आदेशनांतर  मंत्रिपद सोडावे लागले होते. 

हेही वाचा : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक रद्द अन् विस्ताराचा मुहूर्त जाहीर 

पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात परंतु, सध्या ही संख्या 53 आहे. यामुळे 28 नवीन सदस्यांचा समावेश होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी मंत्रिमंडळातील सदस्यांना गटाने बोलावून त्यांच्याशी चर्चाही केली होती. विस्तारात प्रादेशिक आणि जातीय समतोल राखला जाणार आहे. याचबरोबर पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकात डोळ्यामसोर ठेवून विस्तार केला जाईल. 

मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले मध्य प्रदेशातील नेते जोतिरादित्य शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. सर्वांनंद सोनोवाल यांनी आसाममध्ये भाजपला दुसऱ्यांदा विजय मिळवून देत हिमंत बिस्वा सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला होता. त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात आहे. याचबरोबर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल. भाजपने त्यांना राज्यातून हलवून केंद्रात नेल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. याचबरोबर राजस्थान आणि  बिहारचे भाजप प्रभारी भूपेंदर यादव, मध्य प्रदेशातील नेते व पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय आणि पक्षाचे प्रवक्ते जफर इस्लाम यांचाही समावेश मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख