केंद्रीय मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द; सायंकाळी 6 वाजता होणार मेगाविस्तार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार आज होणार आहे.
narendra modi union cabinet expansion is likely at 6 pm
narendra modi union cabinet expansion is likely at 6 pm

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. मोदींकडून सुमारे 28 जणांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, असा अंदाज आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची आणि आर्थिक कामकाजविषयक मंत्रिसमितीची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात परंतु, सध्या ही संख्या 53 आहे. यामुळे 28 नवीन सदस्यांचा समावेश होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी मंत्रिमंडळातील सदस्यांना गटाने बोलावून त्यांच्याशी चर्चाही केली होती. विस्तारात प्रादेशिक आणि जातीय समतोल राखला जाणार आहे. याचबरोबर पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकात डोळ्यामसोर ठेवून विस्तार केला जाईल. 

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज सकाळी 11 वाजता होणार होती. याचबरोबर आर्थिक कामकाजविषयक मंत्रीसमितीची बैठक 11 वाजून 5 मिनिटांनी होणार होती. या दोन्ही बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. सायंकाळी मंत्रिमंडळ विस्तार असल्याने या बैठक तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. आज सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात नवीन मंत्री शपथ घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले मध्य प्रदेशातील नेते जोतिरादित्य शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. सर्वांनंद सोनोवाल यांनी आसाममध्ये भाजपला दुसऱ्यांदा विजय मिळवून देत हिमंत बिस्वा सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला होता. त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात आहे.

याचबरोबर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल. भाजपने त्यांना राज्यातून हलवून केंद्रात नेल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. याचबरोबर राजस्थान आणि  बिहारचे भाजप प्रभारी भूपेंदर यादव, मध्य प्रदेशातील नेते व पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय आणि पक्षाचे प्रवक्ते जफर इस्लाम यांचाही समावेश मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचेही नाव आघाडीवर आहे. मराठा आरक्षण प्रश्नामुळे राणेंसारख्या मराठा चेहऱ्याला संधी दिली जाईल, असे मानले जात आहे. याचबरोबर बीडच्या भाजप खासदार प्रितम मुंडे यांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रितम यांना स्थान दिले जाण्याची शक्यता अधिक आहे. याचबरोबर नंदूरबारच्या खासदार हिना गावित यांचेही नाव घेतले जात आहे.

राज्यातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट, तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री असे सहा मंत्री  आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, पण महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर सावंत यांना पक्षाच्या आदेशनांतर  मंत्रिपद सोडावे लागले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com