घरवापसी केलेल्या मुकुल रॉय यांना मानाचं पान अन् भाजप नेत्यांना टाकलं अडगळीत! - mukul roy appointed as pac head in west bengal assembly | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

घरवापसी केलेल्या मुकुल रॉय यांना मानाचं पान अन् भाजप नेत्यांना टाकलं अडगळीत!

वृत्तसंस्था
शनिवार, 10 जुलै 2021

पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवानंतर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व आमदार मुकुल रॉय यांची तृणमूलमध्ये घरवापसी झाली होती. 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) भाजपच्या (BJP) पराभवानंतर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व आमदार मुकुल रॉय (Mukul Roy) यांची तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) घरवापसी झाली होती. आता रॉय यांच्यावर तृणमूलने मोठी जबाबदारी टाकली आहे. लोक लेखा समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. याचवेळी भाजप नेत्यांना मात्र, विधानसभेच्या समित्यांमध्ये नगण्य स्थान देण्यात आले आहे. 

विधानसभेचे अध्यक्ष विमान बॅनर्जी यांनी लोक लेखा समितीच्या अध्यक्षपदी रॉय यांची निवड केली. विधानसभेच्या इतर समित्यांमध्ये भाजपच्या नेत्यांना अतिशय कमी स्थान देण्यात आले आहे. यामुळे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी हे संतापून सभागृहातून बाहेर पडले. यापुढे विधानसभेच्या कोणत्याही समितीचे अध्यक्षपद भाजप स्वीकारणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. लोक लेखा समितीच्या अध्यक्षपदी विरोधी पक्षाचा आमदार असतो, असा प्रघात आहे. परंतु, सत्ताधारी तृणमूलने या नियमाचा भंग केला, अशी टीकाही अधिकारी यांनी केली. 

अधिकारी म्हणाले की, लोक लेखा समितीत 20 सदस्य असतात. आम्ही आमच्या 6 आमदारांची नावे दिली होती. मुकुल रॉय यांच्या नावाची शिफारस भाजपने केली नव्हती. त्यांनी जाहीरपणे भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. अर्थतज्ञ व आमदार अशोक लाहिरी यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी व्हावी, अशी आमची मागणी होती. भ्रष्टाचारी तृणमूल महत्वाच्या पदांवर नियुक्ती केली आहे. 

हेही वाचा : राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारत नसल्याने काँग्रेस लढवणार नवी शक्कल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपमज्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये मुकुल रॉय यांचा समावेश होता. भाजपचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमधून आलेले अनेक नेते उघडपणे घरवापसीबद्दल बोलू लागले होते. या पार्श्वभूमीवर रॉय हे पुन्हा तृणमूलमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली होते. भाजपमध्ये ते बाजूला फेकले गेले असून, ते नाराज असल्याचेही बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे ही चर्चा सुरू झाली होती.  

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे व तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय आणि त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांचा पक्षप्रवेश झाला होता. मुकुल रॉय यांनी ममतांवर व्यक्तिगत पातळीवरील टीका करणे टाळले होते. त्यामुळे त्यांचा समावेश मवाळ नेत्यांमध्ये होता. याचवेळी सुवेंदू अधिकारी यांनी सातत्याने ममतांना लक्ष्य केले होते. त्यामुळे त्यांचा समावेश जहाल नेत्यांमध्ये होता. मवाळ नेत्यांसाठी तृणमूलचे दरवाजे खुले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख