राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारत नसल्याने काँग्रेस लढवणार नवी शक्कल! - congress party may have more than one vice president | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारत नसल्याने काँग्रेस लढवणार नवी शक्कल!

वृत्तसंस्था
शनिवार, 10 जुलै 2021

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तिढा अद्याप कायम आहे. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळत नसल्याचे चित्र आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाचा (president) तिढा अद्याप कायम आहे. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळत नसल्याचे चित्र आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याने काँग्रेसने आता नवीन पर्याय समोर आणला आहे. पक्षातील नेतृत्वाची पोकळी दूर करण्यासाठी एकापेक्षा जास्त उपाध्यक्ष नेमण्यासह संघटनात्मक पातळीवर फेररचना करण्यात येणार आहे.  

पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार मागणी होत असली तरी राहुल गांधी हे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नाहीत. यामुळे पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पक्षाचे एकापेक्षा जास्त उपाध्यक्ष नेमावेत, असा प्रस्ताव समोर आला आहे. याआधीही वर्षभरापूर्वी प्रस्ताव समोर आला होता. आता नेतृत्वाने यावर गांभीर्याने विचार करण्यास सुरवात केली आहे. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय काँग्रेस समितीची फेररचना करण्यात येणार आहे. पक्षाला एकापेक्षा जास्त उपाध्यक्ष नेमण्यात येतील. हे उपाध्यक्ष देशातील विभागांनुसार असतील. 

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दोन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत  जानेवारी महिन्यात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीत अध्यक्षपदाची निवडणूक जून महिन्यात घेण्याचा निर्णय झाला होता. यानंतर जून महिन्यात काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक झाली. यात 23 जूनला होणारी अध्यक्षपदाची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संकटामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे कार्यकारी समितीने म्हटले होते. 

हेही वाचा : काकांच्या विरोधातील लढाई अखेर पुतण्या हरला 

मागील लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता. शेवटी सोनिया गांधी यांनाच पुन्हा हंगामी अध्यक्ष म्हणून काम सुरू करावे लागले. पक्षाला अद्याप पुर्णवेळ अध्यक्ष न मिळाल्याने काही नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. सतत बैठका होऊनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत मरगळ दिसून येत आहे. 

गेल्या वर्षी पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पत्र पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिले होते. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली कपिल सिब्बल, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. या पत्राने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर पक्षाची तातडीची बैठक घेऊन या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले होते. या नेत्यांचे समाधान झाल्याचा दावा अन्य नेत्यांकडून करण्यात आला होता पण त्यानंतरही पक्ष नेतृत्वामध्ये बदल झाला नव्हता. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख