दुभंगलेली मराठी मने जोडणार! राज ठाकरेंचा वाढदिवशी संकल्प - mns chief raj thackeray says he will bridge gap between communities | Politics Marathi News - Sarkarnama

दुभंगलेली मराठी मने जोडणार! राज ठाकरेंचा वाढदिवशी संकल्प

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 जून 2021

जातीच्या विद्वेषाने मराठी मने दुभंगली असली तरी मी आत्मविश्‍वासाने सांगतो की महाराष्ट्र म्हणून सर्वांना एकत्र आणेन. 

मुंबई : जातीच्या विद्वेषाने मराठी मने दुभंगली असली तरी मी आत्मविश्‍वासाने सांगतो की महाराष्ट्र म्हणून सर्वांना एकत्र आणेन,  असा संकल्प महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज सोडला. राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून तयार झालेल्या राजकीय विसंवादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका महत्वाची मानली जात आहे. 

राज ठाकरे यांनी आज (ता.१४) त्यांचा वाढदिवस सार्वजनिक पातळीवर साजरा केला नाही. कोरोनाचे संकट असल्याने आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले होते. असे असले तरी कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी राज ठाकरे यांनी स्वतःच्या आवाजातला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मनसेच्या अधिकृत ट्विवटर हॅंडलवर तो  पोस्ट करण्यात आला आहे. जातीयवाद आणि मराठी अस्मितेवर मार्मिक भाष्य करणारी त्यांनी स्वतः काढलेली व्यंगचित्रेही व्हिडिओसोबत जोडली आहेत. 

हेही वाचा : भाजपने तेलंगणमध्ये रोवले पाय..टीआरएसचा बडा नेता गळाला 

महाराष्ट्र जातीयवादात अडकलेल्या इतर कोणत्या राज्यांपेक्षा लवकर बाहेर येईल, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. जातीच्या विद्वेषाने दुभंगलेल्या मराठी मनांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. मधल्या काळात जातीयवादाचा थोडा त्रास झाला असला तरी इतर कोणत्याही राज्यापेक्षा आपण अधिक लवकर बाहेर येऊ, असे त्यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्राची जडणघडणच अशी आहे की आपण जातीयवादातून लवकर बाहेर येऊ. यासाठी मी या सर्व जणांना महाराष्ट्र म्हणून एकत्र आणणार आहे. त्रासदायक आहे पण सर्व होईल, महाराष्ट्राच्या मातीत ती क्षमता आहे. ती युरोपमधल्या कुठल्याही मातीपेक्षा जास्त आहे, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख