भाजपने तेलंगणमध्ये रोवले पाय; टीआरएसचा बडा नेता गळाला

दक्षिणेतील राज्यात विस्तार करण्यावर भाजपने मागील काही काळापासून भर दिला आहे.
former minister and trs leader etela rajender joins BJP
former minister and trs leader etela rajender joins BJP

नवी दिल्ली : दक्षिणेतील राज्यांत विस्तार करण्यावर भाजपने (BJP) मागील काही काळापासून भर दिला आहे. आता भाजपच्या गळाला तेलंगणमधील (Telangana) सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीचा (TRS) बडा नेता लागला आहे. नुकताच टीआरएसचा राजीनामा दिलेले एटेला राजेंद्र (Etela Rajender) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 

दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात हा कार्यक्रम झाला. या वेळी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी.किशन रेड्डी उपस्थित होते. राजेंद्र यांची 2 मे रोजी तेलंगणच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांनी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप झाल्यानंतर पक्षाने हे पाऊल उचलले होते. यानंतर त्यांनी  टीआरएसचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. याचबरोबर त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला होता. तेलंगणचे मुख्यमंत्री व टीआरएसचे सर्वेसर्वा के.चंद्रशेखर राव यांच्याशी मागील 5 वर्षांपासून त्यांचे मतभेद होते. 

मुख्यमंत्री राव यांनी राजेंद्र यांच्याकडील आरोग्यमंत्री पदाचा कार्यभार स्वत:कडे घेतला होता. राजेंद्र यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. राजेंद्र यांनी मात्र, सर्व आरोप फेटाळून लावले होते. ते म्हणाले  होते की, या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी. मी दोषी आढळल्यास ते माझ्यावर कारवाई करु शकतात. माझा अनेकवेळा अपमान करण्यात आला. मी तेलंगणचा नेता असून, टीआरएस पक्षाचा गुलाम नाही.  

एका अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या पत्राच्या आधारे माझ्या विरोधात चौकशी सुरू झाली. चौकशी सुरू झाल्यानंतर काही तासांतच मला मंत्रिपदावरुन हटवण्यात आले. माझ्या विरोधात निराधार आरोप करण्यात आले. मला कोणतेही स्पष्टीकरण अथवा उत्तर देण्याची संधीही देण्यात आली नाही. या प्रकारे पक्षाने माझ्यावर कारवाई केली, असा आरोपही राजेंद्र यांनी केला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com