सीमेवर गोळीबार अन् थेट शेजारच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा - mizoram register fir against assam chief minister himanta biswa sarma-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

सीमेवर गोळीबार अन् थेट शेजारच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

वृत्तसंस्था
शनिवार, 31 जुलै 2021

आसाम व मिझोराम सीमेवर केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात केले आहे. असे असले तरी दोन्ही राज्यांतील वाद आणखी चिघळला आहे. 

नवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेल्या  हिंसाचारात आसाम पोलीस (Police) दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला होता. आता सीमेवर केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) तैनात केले आहे. असे असले तरी दोन्ही राज्यांतील वाद आणखी चिघळला आहे. मिझोरामने आता चक्क आसामच्या मुख्यमंत्र्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 

सीमेवर झालेल्या हिंसाचारप्रकरणी आसाम पोलिसांनी मिझोराममधील राज्यसभा खासदार के. वानलालवेना यांच्याविरोधात कारवाई करण्याची पावले उचलली आहेत. यानंतर मिझोरामने या प्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर आसामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मिझोराममधील कोलासिब जिल्ह्यातील वैरेंग्टे पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. 

पोलिसांनी म्हटले आहे की, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या आदेशानुसार आसाम पोलिसांनी मिझोराम पोलिसांशी शांततेने चर्चा करण्यास नकार दिला. त्यांनी कोलासिबचे पोलीस अधीक्षकांना कळवले की मिझोरामचा भूभाग आसामच्या मालकीचा आहे. तेथे त्यांनी कॅम्प उभारणीचे नियोजन केले होते. 

सीमेवरील संघर्षानंतर दोन्ही राज्ये एकमेकांवर आरोप करीत आहेत. वादग्रस्त भागात आसामने नव्या चौक्या उभारल्या आहेत, असा आरोप मिझोरामने केला आहे. याचवेळी मिझोरामने वादग्रस्त भागात बंकर उभारले आहेत, असा आरोप आसामने केला आहे. याचबरोबर दोन्ही राज्यांनी सीमेवर निमलष्करी दले असतानाही त्यांचा बंदोबस्त वाढवला आहे. यामुळे दोन राज्यांतील सीमेवरील आंतरराष्ट्रीय सीमेप्रमाणे बनली असून, बंकर आणि चौक्यांची उभारणी दोन्ही राज्यांकडून सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  
आसाम -मिझोराम सीमेवर 26 जुलैला झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलाचे सहा जवान मृत्यूमुखी पडले होते तर 45 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे  देशभरात खळबळ उडाली होती. आसाम-मिझोराम सीमेवरील स्थितीवर केंद्रीय गृह मंत्रालय नजर ठेवून आहे. सीआरपीएफच्या तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही राज्यांतील पोलिसांत संघर्ष होऊ नये, यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यांना शांतता कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुन्हा सीमेवर तणाव निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. 

हेही वाचा : खासदाराच्या चौकशीसाठी पोलिसांनी ठोठावला संसदेच्या दरवाजा 

गृहमंत्री अमित शहा नुकतेच ईशान्य भारतातील राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. मिझोराममधील ऐजॉल, कोलाबिस आणि मामित तर आसाममधील काचर, हेलकांडी आणि करीमगंज या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. या सीमेची लांबी 164.6 किमी एवढी आहे. मागील अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा मुद्दा असून त्यावरून सातत्याने हिंसा होते. दोन्ही राज्यांतील नागिरक अनेकदा एकमेकांना भिडतात. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख