मोठी बातमी : एसपी निंबाळकरांवरील खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा अखेर मागे

मिझोरामने या प्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह आसामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.
mizoram cm withdraws fir against assm cm and other officials
mizoram cm withdraws fir against assm cm and other officials

नवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेल्या  हिंसाचार प्रकरणी आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल केलेला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घेण्याची घोषणा मिझोरामचे (Mizoram) मुख्यमंत्री झोरामथांगा (Zormathanga) यांनी केली आहे. या संघर्षात पायाला गोळी लागून जखमी झालेले काचारचे पोलीस अक्षीधक वैभव निंबाळकर (Vaibhav NImbalkar) यांचाही यात समावेश आहे. 

झोरामथांगा यांनी म्हटले आहे की, मिझोराम-आसाम सीमावादावर परस्पर सहमतीने तोडगा काढण्यासाठी आम्ही पाऊल उचलत आहोत. या वादामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे मी मिझोराम पोलिसांना वैरेंग्टे येथे 26 जुलैला दाखल एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला आहे. 

सीमेवर झालेल्या हिंसाचारप्रकरणी आसाम पोलिसांनी मिझोराममधील राज्यसभा खासदार के. वानलालवेना यांच्याविरोधात कारवाई करण्याची पावले उचलली होती. यानंतर मिझोरामने या प्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह आसामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मिझोराममधील कोलासिब जिल्ह्यातील वैरेंग्टे पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. 

आसामच्या मुख्यमंत्र्यांसह आसामचे 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी, 2 प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 200 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आसामचे पोलीस महनिरीक्षक अनुराग अग्रवाल, उपमहानिरीक्षक देवज्योती मुखर्जी, काचारचे पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर आणि धौलाई पोलीस ठाण्याचे प्रभारी साहब उद्दीन यांचा समावेश होता. काचार उपायुक्त कीर्ती जल्ली आणि कचर विभागीय वन अधिकारी सनीदेव चौधरी यांच्यावरही याच आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. सीमेवर झालेल्या हिंसाचारात पोलीस अधीक्षक निंबाळकर हे जखमी झाले होते. त्यांच्या पायाला गोळी लागली असून, त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आता खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात मिझोराम पोलिसांनी त्यांनाही आरोपी केले आहे. निंबाळकर हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसरचे आहेत. 

आसाम-मिझोराम सीमेवरील संघर्षानंतर दोन्ही राज्ये एकमेकांना आव्हान देत होती. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्रीही आक्रमक भूमिका घेत संघर्षाच्या तयारीत होते. यामुळे अखेर अमित शहांनी सरमा आणि झोरामथांगा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आसाममध्ये भाजपची सत्ता असून, मिझोराममध्येही भाजपचीच सत्ता आहे. मिझोराममध्ये भाजपचा सहकारी पक्ष मिझो नॅशनल फ्रंट सत्तेवर आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचीच सत्ता असताना अशा प्रकारे संघर्ष होणे केंद्रीय नेतृत्वाला परवडणारे नव्हते. 

अखेर अमित शहांनी सरमा आणि झोरामथांगा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सीमावादावर शांततामय मार्गाने चर्चेतून तोडगा काढावा, असे निर्देश त्यांनी दिली. प्रक्षोभक वक्तव्ये केल्याप्रकरणी त्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांची कान उघाडणी केली. यानंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे चर्चेची भूमिका घेत मैत्रीचा हात पुढे केला. आता दोन्ही मुख्यमंत्री शांततामय मार्गाने चर्चेने प्रश्न सोडवू, असे म्हणत आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com